काही दिवसांवर असलेल्या दिवाळी हंगामानिमित्त नियमित फेऱ्यां आणि जादा गाड्यासह नंदुरबार आगार सज्ज झाले आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा लाभ घेण्याचे आवाहन धुळे विभागीय नियंत्रक मणिषा सपकाळ तसेच आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे. दर अर्ध्या तासांनी धुळे आणि नाशिक साठी मंगळवारपासून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातर्फे दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवार दिनांक 26 ऑक्टोबरपासून जादा बसेस धावणार आहेत. यात नंदुरबार- पुणे सकाळी अकरा वाजता, बारा वाजता, दुपारी दोन वाजता त्यानंतर चार वाजता, सायंकाळी सात वाजता आणि रात्री नऊ वाजता राहील. तसेच नंदुरबार- मुंबई रात्री आठ वाजता, नंदुरबार- शिर्डी सकाळी दहा वाजता, नंदुरबार- औरंगाबाद दुपारी 12:30 वाजता, आणि पुन्हा रात्री 8:45 वाजता, नंदुरबार- जळगाव सकाळी पाच वाजता, नऊ वाजता आणि दुपारी 12:30 वाजता, तसेच दुपारी तीन वाजता, धुळे साठी देखील जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. परिवहन महामंडळाच्या आदेशानुसार गर्दीच्या हंगामात राज्यातील प्रत्येक आगारामधून सुटणाऱ्या बसेस साठी 17 टक्के भाडेवाढ होईल. मात्र सदर भाडेवाढ दिवाळीच्या मर्यादित काळापुरती राहील असेही नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी स्पष्ट केले आहे.