नंदुरबार | प्रतिनिधी –
दिल्ली येथील स्काऊट, गाईड नॅशनल हेडक्वार्टर कार्यालयातून प्रकाशा ता.शहादा येथील सर्वोदय विद्या मंदिरातील शिक्षक व विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या सहीने पाठविण्यात आलेले प्रमाणपत्र तब्बल बारा वर्षानंतर मिळाल्याचा अजब प्रकार घडला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नंदुरबार जिल्हयाची दुर्गम भाग, अविकसित अशी ओळख आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही सातपुड्याच्या दुर्गम भागात वसलेल्या अनेक आदिवासी पाड्यांवर आजही मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाही. जिल्ह्यात मोठया प्रमाणावर योजना येतात पण उशिराने पोहोचतात हे वास्तव आहे. परंतू दिल्ली येथील स्काऊट-गाईड नॅशनल हेडक्वार्टर दिल्ली या कार्यालयातून पाठवलेले पंतप्रधानांच्या सहीचे प्रमाणपत्र तब्बल बारा वर्षानंतर मिळाल्याचा अजब प्रकार घडला आहे. देशाची राजधानी दिल्ली ही नंदुरबार जिल्ह्यापासून सुमारे बाराशे किलोमीटर लांब आहे. त्यामुळे कुठलाही पत्रव्यवहार म्हणा, कुरीअर, पार्सल हे आठ ते पंधरा दिवसात नंदुरबारहून दिल्लीला किंवा दिल्लीहून नंदुरबारला पोहचत असते. प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिरातील स्काऊटचे विद्यार्थी व शिक्षक यांचा दि.४ ते ८ जानेवारी २०१२ दरम्यान दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला होता. त्या सन्मानाचे प्रमाणपत्र प्रकाशा येथे तब्बल बारा वर्षांनी प्राप्त झाले आहे. या प्रमाणपत्रावर तत्कालीन प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांची स्वाक्षरी असून ६ जानेवारी २०१२ रोजी दिल्लीहून हे पत्र पाठवल्याची तारीख नमुद आहे. तर हे पत्र ५ ऑक्टोंबर 2021 रोजी मिळाले.
६ जानेवारी २०१२ रोजी दिल्ली हुन निघालेल्या या पत्राचा प्रवास मुंबई मार्गे झाला असून मुंबईहून नंदुरबार व प्रकाशा येथे पोहोचण्यासाठी तब्बल आठ महिन्यांचा कालावधी लागल्याचे पाहावयास मिळाले आहे. प्रकाशा नंदुरबार ते मुंबई ४०० किलोमीटरचा प्रवास आठ महिने लागत असेल व दिल्लीहून बारा वर्षे लागत असेल तर दुर्गम भाग व अविकसित जिल्हा ओळख पुसण्यासाठी शासनाला आणखी किती वर्षे लागतील हे सांगणे कठीण आहे.
दरम्यान, सन २०१६ पासून ज्या शिक्षकांनी पंतप्रधान ढाल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे त्यांना अद्याप निकाल मिळालेला नाही. सन २०१८- १९ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते व ते पास झालेले आहेत अद्याप त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाहीत. सन २०१७-१८ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती पुरस्कार चाचणी परीक्षा पुणे व नागपूर या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्या निकाल आत्ता देण्यात आला. ज्या वेळेला ते विद्यार्थी कालबाह्य होऊन गेले.
स्काऊट आणि गाईड ही चळवळ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आहे. विद्यार्थ्यांसाठी राज्य पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार परीक्षा असतात मात्र त्यांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांना त्याचा उपयोग होत नाही. यासाठी नॅशनल हेडकॉटर दिल्ली व महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड या संस्थेने ही यंत्रणा जलद गतीने करण्याची गरज आहे. जेणेकरून वेळेवर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळतील व शिक्षकांनाही त्याचा मनस्ताप होणार नाही.