नंदुरबार l प्रतिनिधी :
शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विरचक प्रकल्पात तापी-बुराई प्रकल्पाचे पाणी सोडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मंत्रालयात मंगळवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विरचक प्रकल्पात तापी-बुराई प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे नंदुरबार शहराच्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग येणार आहे. याबाबत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पाठपुरावा केला होता.
या बैठकीत शिवसेनेचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तापी-बुराई प्रकल्पाचे पाणी बुराई नदीकडे वळविताना त्याच पाण्यातून ठाणेपाडा धरणही भरून घ्यावे, अशी मागणी केली. या मागणीची दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यामुळे ठाणेपाडा धरणाच्या पाणीप्रश्नावरही सकारात्मक निर्णय होण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाहीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
निंभेल, आसाणे, शनिमांडळच्या धरणांतही तापीचे पाणी
नंदुरबार तालुक्यातील निंभेल, आसाणे आणि शनिमांडळ या गावांमधील धरणांमध्येही तापी-बुराई प्रकल्पाचे पाणी लवकरात लवकर आणून स्थानिक पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी संबंधित योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यावर चर्चा झाली.
बिलाडी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतही सूचना
बिलाडी धरणामुळे बाधित झालेल्या खामगाव येथील आदिवासी कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही बैठकीत उपस्थित झाला. या कुटुंबांना शबरी घरकुल योजनेतून घरे उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.








