नंदुरबार l प्रतिनिधी-
अंबाबारी ता.अक्कलकुवा येथे जल अर्पण कार्यक्रम संप्प्न्
नंदुरबार (प्रतिनिधी) जल जीवन मिशन अंतर्गत अंबाबारी (ता.अक्कलकुवा) गावासाठी करण्यात आलेली नळ पाणी पुरवठा योजना ही शासनाची योजना नसून ती गावकऱ्यांची योजना आहे. या योजनेतून कायमस्वरुपी शुद्ध, नियमित व पुरेसे पाणी मिळण्यासाठी त्याची नियमित देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची आहे. त्यासाठी सर्वांनी ग्रामपंचायतीला पाणी पट्टी वेळेवर भरुन सहकार्य करावे. तसेच योजनेतून पाणी पुरवठा शाश्वत राहण्यासाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना रुजवावी असे आवाहन आ.आमश्या पाडवी यांनी केले.
पाणी पुरवठा योजना अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी आणि योजनेमध्ये सामुदायिक सहभाग वाढविण्यसाठी केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालय व राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सुचनानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8 मार्च ते 22 मार्च, दरम्यान “जल महोत्सव” उपक्रम राबविण्यात येत आहे.
त्यानुसार अंबाबारी (ता.अक्कलकुवा) येथे अक्कलकुवा- अक्राणी विधानसभा मतदार संघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत जल अर्पण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना आमदार पाडवी बोलत होते. आमदार पाडवी पुढे म्हणाले की, नळ पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असून योजनेचे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात येत आहे. योजनेतून शुद्ध, मुबलक पिण्याचे पाणी ग्रामस्थांना देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असली तरी, पाणी पुरवठा उपांगांची देखभाल करुन योजनेविषयी ग्रामस्थांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली तरच योजना शाश्वत राहील. यासाठी सर्वांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करुन वेळेवर पाणी पट्टी भरावी असे आवाहनही आमदार पाडवी यांनी यावेळी केले.
यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थांनी गावातून जलदिंडी काढून योजनेविषयी ग्रामस्थांमध्ये जाणीव जागृती केली. प्रारंभी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यानंतर आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येऊन पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता अजय पाटील अक्कलकुवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय अहिरे ,सरपंच विद्या तडवी यांच्या हस्तेही जलपूजन करण्यात आले. कार्यक्रमास उप अभियंता तुषार वाघ, निलेश तडवी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता,ग्रामपंचायत अधिकारी गुलाबसिंग वळवी ,ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








