नंदुरबार l प्रतिनिधी
अयोध्यातील श्रीराम मंदिर, जम्मू काश्मीर प्रमाणेच सागबारा (गुजरात) येथील कुलदैवत देवमोगरा माता मंदिर परिसरात ‘महाराष्ट्र आदिवासी भवन’ उभारण्याची मागणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी काल शुक्रवारी झालेल्या जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाची दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या बैठकीत केली. या मागणीची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्याचा आदेश दिले आहेत.
जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाची दूरदृश्य प्रणालीद्वारे काल शुक्रवारी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत आ.चंद्रकांत रघुवंशींनी आदिवासी समाजाचा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. ते म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून लाखो भाविक भक्तगण वर्षभर सागबारा (गुजरात) येथील मंदिरात दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी जात असतात. परंतु, त्या ठिकाणी अपेक्षित अश्या सोयी सुविधा नाहीत. जागे अभावी भाविकांना अडचणींच्या सामना करावा लागत असतो. मान मानता फेडण्यासाठी आलेल्या भाविकांना उघड्यावरच स्वयंपाक करावा लागतो. निवासासाठी सुविधा देखील नाही.
आदिवासी भाविकांची सोय करा
मंदिर परिसरात महाराष्ट्र आदिवासी भवनाची निर्मिती झाल्यास भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध होतील. भवन झाल्यास भाविक भक्तांना मोठा लाभ होईल. यासाठी १० कोटींच्या निधी मंजूर करण्यात यावे. बैठकीत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहेत.







