नंदुरबार l प्रतिनिधी-
भालेर येथील का. वि. प्र. सं. संचलित द फ्युचर स्टेप स्कूल येथे शिवजयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर हिरामण पाटील प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नागरिक भटा पाटील, अभिमन्यू पाटील, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक एम. आर. पाटील व एम. बी. अहिरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर शालेय परिसरात विद्यार्थ्यांनी रॅली काढून शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
या सांस्कृतिक कार्यक्रमात नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या प्रेरणादायी गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडले, तर चिमुकल्यांनी दिलेल्या “जय भवानी, जय शिवाजी”च्या गर्जनांनी संपूर्ण परिसर आनंदमय झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन उमेश सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.








