नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने कर थकविणाऱ्या व्यावसायिकांविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली असून मंगळवारी व बुधवारी अश्या दोन दिवसात शहरातील विविध भागांतील सुमारे 20 दुकानांवर कारवाई करून ती सील करण्यात आली. मुख्याधिकारी शिवाश सिंग यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली.
नगरपालिकेकडे मालमत्ता कर, पाणीपट्टी तसेच इतर करांच्या थकबाकीची मोठी रक्कम प्रलंबित असून संबंधित व्यावसायिकांना यापूर्वी अनेकदा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र वारंवार सूचना देऊनही कर भरणा न झाल्याने अखेर कठोर पाऊल उचलत सील करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मुख्याधिकारी शिवाश सिंग यांनी सांगितले की नगरपालिकेचा महसूल वाढविण्यासाठी थकबाकी वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. कर न भरणाऱ्या व्यवसायिकांवर नियमांनुसार कारवाई केली जाईल. ज्यांनी तात्काळ थकबाकी भरली, त्यांच्यावरची कारवाई शिथिल करण्यात येईल.
या कारवाईदरम्यान कर निरीक्षक सुनिल चौधरी,शशी वाघ,संजय वळवी, ईश्वर पाटील व नगर पालिकेचे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईमुळे थकबाकीदार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी तातडीने कर भरण्यासाठी नगरपालिकेकडे धाव घेतली आहे.
नगरपालिकेच्या या कारवाईमुळे इतर थकबाकीदारांना इशारा मिळाला असून आगामी काळातही अशी मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.








