नंदुरबार प्रतिनिधी
नगरपालिकेचा उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश शिरीष चौधरी यांच्या बाजूने 30 मते मिळाल्याने त्यांच्या विजयी झाला तर प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपच्या नीता सतीश मराठे यांना अवघे 8 मते मिळून त्यांच्या पराभव झाला. या निवडणुकीत एमआयएमचे 4 सदस्य तटस्थ राहिले. उपनगराध्यक्ष निवडीनंतर स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी घेण्यात आलेल्या सभेत शिवसेना शिंदे गटाकडून परवेज खान,उमेश जैन,गौरव चौधरी तर भाजपकडून चारुदत्त कळवणकर यांची नियुक्ती झाली.
नंदुरबार नगरपरिषदेवर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकून सौ.रत्ना रघुवंशी विजयी झाल्या आहेत. निकालानंतर त्यांनी नगराध्यक्षपदाचा नुकताच कार्यभार स्वीकारला. नगरपरिषदेवर शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व असून 29 नगरसेवक निवडून आले आहेत तर भाजपचे 8 आणि एमआयएमचे 4 असे पक्षीय बलाबल आहे. नगरपरिषदेच्या अधिनियमातील कलम व नियमान्वये उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यासाठी शनिवारी पालिकेच्या लोकनेते माणिकरावजी गावित सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या पीठाचे अधिकारी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी होत्या.
सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत विहित मुदतीत शिवसेना शिंदे गटाकडून प्रथमेश शिरीष चौधरी तर भाजपकडून मराठे यांनी नामांकन अर्ज मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याकडे सादर केला. प्रथमेश चौधरी यांच्या अर्जावर सूचक म्हणून नगरसेवक किरण रघुवंशी तर अनुमोदक म्हणून नगरसेवक राऊ मोरे यांचे नाव होते तर नीता मराठे यांच्या अर्जावर सूचक म्हणून सारिका माळी तर अनुमोदक म्हणून पंकज चौधरी यांचे नाव होते.
दुपारी 12 वाजता सभेचे कामकाज सुरू झाले. दोन्ही उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैद्य ठरवण्यात आले. उपाध्यक्षपदाच्या नामनिर्देशक पत्र माघारी साठी 15 मिनिटांची मुदत देण्यात आली होती. मुदतीत उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली.
सभागृहात हात उंचावून मतदान घेण्यात आले असता भाजपचा नीता मराठे यांना 8 मते मिळाली तर शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश शिरीष चौधरी यांना नगराध्यक्षांसह 30 मते मिळाल्याने ते विजयी झाले. यावेळी एमआयएमचे 4 नगरसेवक तटस्थ राहिले. सभेच्या पिठाची अधिकारी, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी यांनी उपनगराध्यक्षपदी प्रथमेश चौधरी विजय झाल्याचे जाहीर करताच नगरपरिषद आवारात जमलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी,नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी,ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.रवींद्र चौधरी,माजी आ.शिरीष चौधरी,शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,नगरसेवक किरण रघुवंशी यांच्यासह शहाद्याची नगराध्यक्ष अभिजीत पाटील व तळोद्याचे योगेश चौधरी यांनी देखील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार केला.
भाजप,एमआयएमकडून सत्कार
विशेष सभा संपल्यानंतर विरोधी भाजप व एमआयएमकडून सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला.विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांच्यासह भाजप नगरसेवक आणि एमआयएमचे नगरसेवक रफत सय्यद यांच्यासह त्यांच्या चारही नगरसेवकांनी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी व उपनगरध्यक्ष प्रथमेश चौधरी आणि स्वीकृत नगरसेवकांच्या सत्कार केला.
राजकारणात विरोधी म्हटल्यावर वाद विवाद, टीका टिप्पणी,आरोप प्रत्यारोप असे समीकरण जोडले जाते. परंतु, झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत पालिकेतील शिवसेना शिंदे गट,भाजप आणि एमआयएमचे नगरसेवक एकमेकांशी हस्तांदोलन करून हास्याचे फवारे उडवीत चर्चा करीत असल्याचे चित्र दिसत होते.









