नंदुरबार l प्रतिनिधी-
“खेड्यात राहून प्रत्यक्ष नैसर्गिक अनुभव घेणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. गावाच्या गरजेनुसार केलेले श्रमदान आणि वैचारिक प्रबोधनासाठी निवडलेले विषय विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील,” असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी उमेश भदाणे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबारच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककातर्फे मौजे काळटोळमी (ता. जि. नंदुरबार) येथे आयोजित “शाश्वत विकासासाठी युवा” या संकल्पनेवरील विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यु. बी. होले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाघाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमाताई पवार, ग्राम विकास अधिकारी रावजी महाले, माजी सरपंच देविदास गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम चौरे, कल्पना गांगुर्डे, प्रगतशील शेतकरी ॲड. प्रकाश गांगुर्डे, गणेश चौरे, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. प्रेमसिंग गिरासे व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. दिनेश सूर्यवंशी उपस्थित होते.
गावकऱ्यांकडून कामाची पोचपावती सरपंच सुषमाताई पवार यांनी स्वयंसेवकांनी राबवलेली स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आणि आंबा बागेच्या संगोपनाच्या कामाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या कार्यामुळे भारावून जाऊन त्यांनी पुढील वर्षीही हे शिबिर याच गावात घेण्याची विनंती आयोजकांना केली. अध्यक्षीय भाषणात डॉ. यु. बी. होले यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
श्रमदानातून गावचा कायापालट १ ते ७ जानेवारी २०२६ या काळात चाललेल्या या शिबिरात स्वयंसेवकांनी दररोज सकाळी ९ ते १२ या वेळेत विविध कामे केली. यामध्ये खंडोबा व हनुमान मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच ३८ खड्डे खोदून वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या आंबा बागेतील गवत व तण काढून झाडांना गेरू-चुना लावून त्यांचे संरक्षण करण्यात आले.
बौद्धिक सत्र आणि प्रबोधन शिबिरात केवळ श्रमदानच नव्हे, तर पडीत जमिनीवर फळझाड लागवड, शाश्वत शेती, शेतीमध्ये ड्रोनचा वापर, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आणि पशुधन व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. सामाजिक प्रबोधनासाठी विद्यार्थ्यांनी हुंडाबळी व स्त्री भ्रूणहत्या या विषयांवर पथनाट्ये सादर केली. तसेच आंधळ्याची काठी, तीन पायांची शर्यत व संगीत खुर्ची यांसारख्या पारंपरिक खेळांचेही आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात स्वयंसेवकाना मौजे वाघाळे ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांना प्रमानपत्र देवून गौरविले. यशस्वितेसाठी परिश्रम शिबिराचा संक्षिप्त अहवाल कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय आगळे यांनी मांडला. स्वयंसेवक हर्षदा भोये, संदीप पाडवी, शुभम जाधव, दिव्या चौरे व युवराज ठाकरे यांनी आपले अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली वसावे व सुनंदा भागीत यांनी केले, तर आभार स्नेहा साबळे हिने मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनंदा गावीत, प्रा. अश्वमेघराज खोंडे, कृषी सहाय्यक संतोष नागरे, संदीप नेरकर व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.









