‘
नंदुरबार l प्रतिनिधी
विकास कामांमध्ये कधीही भेदभाव केलेला नाही आणि भविष्यात देखील करणार नाही. नंदनगरीच्या सेवेसाठी नेहमी कटिबद्ध राहून समतोल विकासाची ग्वाही देत शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेना शिंदे गटाचा महाविजयी सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ’ च्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधत खरपून समाचार घेतला.
नंदुरबार नगरपरिषदेवर शिवसेनेच्या भगवा फडकल्यानंतर सुभाष चौकात महाविजयी सभा घेण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून आ. रघुवंशी बोलत होते. सभेचा ठिकाणी व्यासपीठाचा मागील बाजूस मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. त्या स्क्रीनवर ‘लाव रे तो व्हिडिओ’ च्या माध्यमातून आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोधकांवर आरोप करत निशाणा साधला. ते म्हणाले,ज्यांनी आयुष्यभर आदिवासींच्या योजनेत भ्रष्टाचार केला, गाईंच्या खरेदी विक्रीचा व्यवहारात पैसे खाल्ले असे लोकं निवडणूक काळात हिंदुत्वाच्या गप्पा मारत होते.आमच्या रक्तात हिंदुत्व असून,आम्ही हिंदू, मुस्लिम सर्व धर्माच्या आदर करूनच राजकारण करत असतो. प्रत्येक समाज धर्माला मान देणं प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे.
यावेळी आ.आमश्या पाडवी,माजी आ.शिरीष चौधरी,प्रा.डॉ रवींद्र चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी,राष्ट्रवादीचे नेते भरत गावित,नवापूरचे नगराध्यक्ष जयवंत जाधव,शहाद्याचे नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, निवडणुकीत भाजप शिवसेना युती होणार होती. भाजपला ११ जागा देणार होतो.५ वर्षासाठी १ पद देणार होतो. परंतु,हिना गावित यांना युती मान्य नव्हती. प्रभाग क्र.१ ते ९ मध्ये सरसकट १८ नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले. विरोधकांना त्या ठिकाणी खात देखील उघडता आला नाही.
*शहराच्या चेहरा मोहरा बदलणार*
गेल्या ३ वर्षांपासून पालिकेत प्रशासकराज होतं. प्रशासक राजवटीत लोकांची समस्या सुटली असं नाही. एका दिवसात विकास कामं होत नाही. परंतु, वर्षभराच्या कालावधीत पूर्वीचे प्रमाणेच नंदुरबार शहराच्या चेहरा मोहरा बदलण्यासाठी आमची संपूर्ण टीम करेल अन् यासाठी फक्त जनतेची साथ हवी.प्रभू रामचंद्राची ३० फुटांची तर भगवान बिरसा मुंडा यांची लोकं सांगतील तेवढ्या फुटांची मूर्ती देखील बसवण्यात येईल असे आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी सभेत सांगितले.
*रस्ते प्रकल्पांना चालना*
आ.रघुवंशी म्हणाले,शहरात 84 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्प सुरू आहे काही कामे मंजूर झालेले आहेत. नोव्हेंबर महिन्यात अल्पसंख्यांक निधीमधून माजी पालकमंत्र्यांनी पालिकेला ५ कोटींच्या निधी दिला असून लवकरच त्याचेही आदेश निघतील.
*पालिकेत निधीचा खळखळाट*
नगरपालिकेत आज निधीची कमतरता आहे.३ वर्षांपासून प्रशासक राज होतं. लोकप्रतिनिधी नसल्याने केंद्र सरकारने १५ वा वित्त आयोगांतर्गत पालिकेला निधी दिला नाही. राज्यातील सर्व नगरपरिषदांना ४० हजार कोटी रुपये विकास कामांसाठी प्राप्त होणार असल्याचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले







