नंदुरबार l प्रतिनिधी-
सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी जेवढे जास्तीत जास्त योगदान देता येईल तेवढे जास्त योगदान देणे आपली सर्वांची जबाबदारी असून, ध्वजदिन निधी संकलनात पुढील वर्षी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त निधी संकलनाचे काम जिल्ह्यात होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज केले.
जिल्हा नियोजन भवन सभागृहात आज सशस्त्र सेना ध्वजदिन-2025 निधी संकलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी बोलत होत्या. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, लेफ्टनंट कर्नल शशिकांत मराठे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीमती सेठी पुढे बोलताना म्हणाल्या की, आपल्या जिल्ह्याने निधी संकलनाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण केले आहे. ध्वजदिन निधी देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या किंवा कर्तव्य बजावताना जखमी/अपंग झालेल्या सैनिक, हवाई दलातील जवान, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी व पुनर्वसनासाठी गोळा केला जातो. यासाठी आपण सर्वजण सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करून महान राष्ट्रकार्यास हातभार लावावा. जिल्ह्यातील सैनिकांच्या कोणत्याही समस्या व अडचणी दूर करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असून त्यांच्या समस्या जिल्ह्यात 100 टक्के सोडविण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यावेळी बोलताना म्हणाले की, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन ही व्यापक व मोठी संकल्पना असून सैनिक आपल्या उमेदीच्या काळात सीमेवर कार्यरत असतात. सैनिकांच्या कार्यामुळेच आपण सर्वजण सुख-सोयींचा उपभोग घेऊ शकतो. अनावश्यक खर्चापेक्षा ध्वजदिन निधीस मदत करावी. ध्वजदिन निधी संकलन करणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे, असे ते म्हणाले.
लेफ्टनंट कर्नल शशिकांत बंसीलाल मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भारत देश प्रत्येक सैनिकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्यामुळे सैनिक पूर्ण भावनेने आपले कार्य करत आहे. त्यामुळे देशाने पूर्ण जगाला दाखवून दिले आहे की भारतीय सेना किती शक्तिशाली आहे. भारतीय सैनिक हा सेवानिवृत्त झाला तरीही तो सैनिकच असतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
*गतवर्षी दिलेले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण : मेजर डॉ. निलेश पाटील*
प्रास्ताविकात बोलताना जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील म्हणाले की, देशाच्या संरक्षणासाठी ज्या सैनिकांनी आपल्या जीवनात बलिदान दिले आहे, तसेच ज्या सैनिकांनी आपल्या आयुष्याची उमेदीची वर्षे देशसेवेत घालवली आहेत, त्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांना सन्मान देण्यासाठी आज सशस्त्र सेना ध्वजदिन साजरा करण्यात येत आहे. सन 1949 मध्ये संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने त्या वर्षापासून दरवर्षी ७ डिसेंबर रोजी ध्वजदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक नागरिकाच्या मनात सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना सदैव असते; मात्र काही ना काही कारणांमुळे आपण ती प्रत्यक्षरीत्या व्यक्त करू शकत नाही. सैनिकांच्या पाठीशी सदैव उभा असलेला त्यांचा परिवार हा सैनिकांपेक्षाही अधिक त्याग करतो. त्यामुळे सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 7 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन साजरा करून निधी संकलित करण्यात येतो. या निधीतून सैनिक व त्यांच्या अवलंबितांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याने गतवर्षी (2024) दिलेले उद्दिष्ट 101.58 टक्के पूर्ण केले आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
गतवर्षी (2024) मध्ये 72 पैकी 52 कार्यालयांनी निधी संकलनाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून, यावेळी कार्यालय प्रमुखांचा सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे काम केल्याबद्दल तसेच जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी ध्वजदिन निधीस दिलेल्या देणगीतून योगदान दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शहीद वीरपत्नी श्रीमती छाया खोत तसेच श्रीमती माधुरी पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात श्रॉफ हायस्कूलच्या संगीत शिक्षिका श्रीमती अनघा जोशी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत तसेच राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले.








