नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे काकेश्वर विद्या प्रसारक संस्था संचलित द फ्युचर स्टेप स्कूल येथे दिवाळी व भाऊबीज साजरी करण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य पी. एस. सूर्यवंशी , पर्यवेक्षक पी. डी. पाटील , तसेच पालक प्रतिनिधी देवीदास महाजन उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या पूजनाने झाली. संपूर्ण शाळा रंगीबेरंगी फुलांनी, कंदिलांनी आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
यानंतर विद्यार्थ्यांनी दिवाळीवर आधारित गाणी, नृत्ये आणि भाषणे सादर केली. भाऊबीज कार्यक्रमात शाळेतील मुलींनी पारंपरिक पद्धतीने मुलांना ओवाळून भाऊबीज साजरी केली. या उपक्रमातून स्नेह, प्रेम आणि एकोप्याचा सुंदर संदेश देण्यात आला.
शिक्षकांनी दिवाळीचे सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व स्पष्ट करत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना दिवाळी होमवर्क देण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना गोडधोड प्रसाद (स्वीट) वाटप करण्यात आले. सर्वांना दिवाळी व भाऊबीजच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
संपूर्ण कार्यक्रम उत्साह, आनंद आणि स्नेहाच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. पी. गिरासे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गांनी मनापासून परिश्रम घेतले.