नंदुरबार l प्रतिनिधी-
राज्यातील सायबर गुन्हयांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे उद्देशाने महाराष्ट्र राज्य सायबर सेलतर्फे “सायबर जनजागृती उपक्रम ऑक्टोबर 2025” हया विशेष अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत नागरिकांना विविध प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यानिमित्ताने आज रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी माहिती देतांना पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, या उपक्रमांतर्गत जिल्हा पोलीस दलातर्फे विविध स्तरावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत असून ऑक्टोबर 2025 या महिन्यात देखील शाळा, महाविदयालये, खाजगी संस्था व इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना सायबर फसवणूकीशी संबंधित OTP फसवणूक, बैंकिंग संबंधी फसवणूक, बनावट वेबसाईट्स, फिशींग लिंक्स, व्हॉट्सअॅपवरील फसवणूक, डिजीटल अरेस्ट, डिप फेक व्हीडीओ फ्रॉड, ऑनलाईन शॉपिंग फसवणूक, इत्यादी बाबत माहिती दिली जात आहे.
“नंदुरबार जिल्हा सायबर सेलने या वर्षातील सायबर फसवणूक संदर्भातील गुन्हयांमधील 1 कोटी 43 लाख 99 हजार 656 रुपये इतक्या रकमेपैकी 34 लाख 37 हजार 825 इतकी रक्कम तक्रारदारांना परत करण्यात यश मिळविले आहे. “तरी नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद व्यवहारासंबंधी किंवा
फसवणूकीबाबत तात्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 व 1945 यावर कळविण्याचे अथवा www.Cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी केले आहे.