सहकार महर्षी, शिक्षण महर्षी स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित शिबिरात 203 रक्तदात्यांनी केले रक्तदान
शहादा l प्रतिनिधी-
दरवर्षाप्रमाणे या वर्षीही परिसराचे भाग्यविधाते, सहकार महर्षी, शिक्षण महर्षी स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने श्री.पी के अण्णा पाटील फाऊंडेशन, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा तालुका खरेदी विक्री संघ, समस्त लेवा पाटीदार गुजर समाज व विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळ (वीएसजीजीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, कृषी बाजार समितीचे माजी सभापती सुनिल पाटील, कृषी बाजार समितीचे माजी उपसभापती रविंद्र राऊळ, रमाकांत पाटील, माजी प्राचार्य डॉ आर.एस.पाटील व मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. रक्तदान करा आणि रुग्णाना जीवदान द्या. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. समाजाला आपणास काही तरी देणे आहे, या भावनेतून प्रत्येक नागरिकाने रक्तदान केले पाहिजे. आपण केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचवू शकतो. रक्तदान ही काळाची गरज आहे, कारण रक्त हे कुठल्याही कारखान्यात बनविले जात नाही त्यासाठी मनुष्याच्याच रक्ताची गरज भासते. रक्तदान केल्याने समाज ऋण फेडण्याची फार मोठी संधी मिळते. रक्तदानामुळे अशक्तपणा येत नाही किंवा संसर्ग होत नाही. मानवतेच्या दृष्टीने रक्तदात्यांची संख्या वाढविणे ही काळाची गरज आहे. या दृष्टीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर विश्वेशरैया हॉल येथे करण्यात आले होते. या शिबिरात एकुण 203 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी नवजीवन ब्लड बँक धुळेचे संचालक डॉ सुनील चौधरी, रक्तपेढी तंत्रज्ञ गजानन चौधरी, चंद्रकांत धनगवाल, रोहिदास जाधव, सनम वळवी, सुरेश राजपूत, तुषार वळवी, आकेश पावरा, गोविंद वसावे, विशाल पावरा व त्यांचे सहकारी शिबिरासाठी उपस्थित होते. या शिबिरासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे सदस्य मयूर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सदर शिबीराच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील विविध शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी वृंद, वीएसजीजीएमचे सदस्य तसेच राष्ट्रीय सेवा योजनाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.