शहादा l प्रतिनिधी
शहादा येथे श्री.पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशन व व्हीएसजीजीएम यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग निदान शिबिराचे आयोजन पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले होते. त्यात तोंडाचा कर्करोग आणि स्तन कर्करोग निदान शिबिरात ७१ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
स्व. अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या जयंतीनिमित्त विद्याविहार-लोणखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात व्हीएसजीजीएमच्या सहयोगाने कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिराचे उद्घाटन पद्मश्री डॉ तात्याराव लहाने, आमदार राजेश पाडवी व मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, संचालक रमाकांत पाटील, ओरल कैंसर स्क्रीनिंग एक्सपर्ट डॉ.सोनल चव्हाण, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. ह्या शिबिरात स्त्रियांच्या स्तन कर्करोग निदानासाठी रोटरी क्लब ऑफ बारडोलीचे अध्यक्ष डॉ. लतेश बी. चौधरी (मुळगाव निझर ह.मु.बारडोली) यांनी विशेष मोबाईल व्हॅनची व्यवस्था करून दिली होती. ज्यामुळे ४१ महिलांची ब्रेस्ट स्क्रिनिंग व मॅमोग्राफी करण्यात आली. तोंडाचा कॅन्सर निदान करण्यासाठी डेलस्कॅन या विशिष्ट उपकरणांच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. ज्यासाठी अरविंदभाई झिपरू पाटील (मुळगाव अनकवाडे, ह.मु. ठाणे, मुंबई) यांनी मशीन्स आणि डॉक्टर्सची व्यवस्था केली होती. यात ३० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील संशयित रुग्णांना किंवा ज्यांचे रिपोर्ट्स पुढील उपचारासाठी विचाराधीन आहेत त्यांना शासकीय योजनांच्या माध्यमातून किंवा काही रुग्णालय व डॉक्टरांच्या सहाय्याने सवलतीच्या दरात पुढील उपचारासाठी सहाय्य करण्यात येणार आहे. ह्या साठी रिपोर्ट आल्यानंतर रुग्णांना कळविण्यात येतील व पुढचे नियोजन करण्यात येईल अशी माहिती आरोग्य शिबिराचे समन्वयक डॉ.प्रफुल्ल पाटील यांनी दिली. या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री.पी.के. अण्णा पाटील फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ सोनाली अभिजीत पाटील, डॉ. भावनेश चव्हाण व डॉ संदीप सूर्यवंशी यांनी रुग्णांची पूर्वतपासणी केली. तसेच फार्मसी महाविद्यालयाचे प्रा डॉ सुनीला पाटील व प्रा. हितेंद्र चौधरी व विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांची उत्कृष्ट भूमिका बजावली. नाव नोंदणीसाठी प्रा. कल्पना पाटील, सौ. हेमलता पाटील, प्रा. मिलिंद पाटील, हितेश पटेल, चेतन चौधरी, हितेश(योगेश) पटेल, स्वप्नील पाटील, नंदलाल पाटील, डॉ अनिलभाई, हिमांशू चौधरी, श्रीराम पटेल यांची विशेष मदत मिळाली. अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व औषधनिर्माणशास्र महाविद्यालय चे प्राचार्य व प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आयोजनासाठी विशेष मदत केली. याचबरोबर विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळाचे रतिलाल पाटील, सौ. हेमलता पाटील, संदीपभाई पाटील, डॉ. राकेशभाई पाटील, प्रवीणभाई पाटील, हितेशभाई पटेल, शितलभाई पाटील, डॉ. योगेशभाई पाटील, धनंजयभाई पाटील, चेतन चौधरी, डॉ योगेश चौधरी, जितेंद्र पाटील आदी सदस्य शिबिरस्थळी उपस्थित होते.
यावेळी श्री.पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशनचे सचिव प्रा.मकरंद पाटील म्हणाले की, सध्या जगभरात वाढत असलेल्या कर्करोग या आजाराच्या व्याप्तीमुळे नंदुरबार परिसरातही कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे या शिबिराद्वारे नागरिकांना वेळेत निदान व उपचार मिळावे आणि त्यांना आरोग्यदायी जीवन जगता यावे, ह्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. ज्यात अत्यंत महागड्या तपासण्या निःशुल्क करण्यात आल्या ज्याला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.