विचार मंथन,किसान दिनानिमित्त पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने व आप की जय परिवार पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित
शहादा l प्रतिनिधी-
येथील श्री.पी.के.अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचार मंथन, किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार दि.9 आक्टोंबर रोजी संपन्न झाला. यावेळी व्यक्ती स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्काराने पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने (मुंबई) यांना तर संस्था स्तरावरील पुरस्काराने ‘आप की जय’ परिवार (मोरवड ता. तळोदा) यांना प्रत्येकी एक लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सरदार पटेल सभागृहात झालेल्या पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे होते.याप्रसंगी माजी केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. व्यासपीठावर सत्कारमूर्ती पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व ‘आप की जय’ परिवाराचे प्रमुख आपश्री जितेंद्र पाडवी यांच्यासह माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, भाजपाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, ओंकार उद्योग समूहाचे प्रमुख बाबुराव बोत्रे पाटील, धुळे येथील माजी महापौर प्रदीप करपे, भाजपाचे माजी धुळे जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी, मंडळाच्या सचिव श्रीमती कमलताई पाटील, शहादा नगर पालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, डॉ.कांतीलाल टाटिया, सातपुडा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रेमसिंग आहेर, पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, संचालक नूहभाई नुरानी, दीपक पटेल, रमाकांत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी अण्णासाहेब पी.के.पाटील यांची प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर माजी मंत्री रावसाहेब दानवे, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील व सचिव कमलताई पाटील यांच्या हस्ते पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलतांना माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे म्हणाले की,वैद्यकीय सेवा करतांना डॉक्टरांनी आपल्यातील माणूस जिवंत ठेवावा. तसेच रुग्णांमध्ये देवदूताची प्रतिमा बघावी.
शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शेतकरी केंद्रबिंदू ठेवून स्वर्गीय अण्णासाहेबांनी अंतिम श्वासापर्यंत कार्य केले. त्यांचेच कार्य पुढे नेण्याचे काम परिसराचे लोकप्रतिनिधी म्हणून आपण करीत आहोत. तापी खोऱ्याला स्वर्गीय अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाकडे पत्रव्यवहार करणार असून शहाद्यात उभ्या राहणाऱ्या 12 एकर क्षेत्रातील स्टेडियमला स्वर्गीय अण्णासाहेबांचे नाव देणार आहोत.सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता येण्यासाठी आपण सर्वांनी तयार राहणे गरजेचे आहे.
माजी खासदार आणि केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले की, स्वर्गीय अण्णासाहेबांचा सहवास जनता पक्षाच्या माध्यमातून 1977 यावर्षी मला लाभला. त्यांनी अपेक्षेच्या पलीकडे जाऊन विकास कार्य केले. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण, सहकार व उद्योग क्षेत्रात मोठे साम्राज्य उभे केले. सद्यस्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी ठेवत जगाच्या पाठीवरील सर्वाधिक चांगले जे असेल त्याची निर्मिती करण्यावर भर दिला आहे. त्यांनी भविष्यातील विकास डोळ्यासमोर ठेवून कार्यावर भर दिला आहे.
संस्था स्तरावरील पुरस्काराने सन्मानित आप की जय परिवाराचे प्रमुख आपश्री जितेंद्र पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यक्ती स्तरावरील पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने मनोगत व्यक्त करतांना म्हणाले,सतत प्रवाहाच्या विरोधात राहून साम्राज्य उभे करण्याचे स्वर्गीय अण्णासाहेबांचे कार्य अद्वितीय अशा प्रकारचे आहे.जागतिक पातळीवर दुर्गम भागातील बालकांना शिक्षणाच्या माध्यमातून मंच निर्माण करून देण्याचे त्यांचे कार्य मोलाचे आहे. आपल्याला सामाजिक सेवा कार्याची प्रेरणा स्वतःच्या आईकडून तसेच आनंदवनाचे बाबा आमटे यांच्याकडून मिळाली आहे. अण्णासाहेब पी.के.पाटील यांचे कार्य महान असून त्यांच्या नावाने प्राप्त झालेला पुरुषोत्तम पुरस्कार पद्मश्री पुरस्काराच्या तोला-मोलाचा आहे. जीवनात एखादे अपयश आले तर खचून न जाता नव्या जोमाने सामोरे जा यश निश्चित आहे.त्यांनी यावेळी विज्ञान, योगा, न्यूरोलॉजी, मनोविज्ञान आदी विषयांवर उदाहरणांसह सहजसोप्या शब्दांत माहिती दिली.सद्यस्थितीत मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून याचा वापर कमी व्हावा यासाठी त्यांनी काही टिप्स दिल्या.
अध्यक्षीय समारोपात माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित म्हणाले की, परिसराचे भाग्यविधाते अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या प्रेरणेनेच आपण राजकारणात आलो. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार समाजाला योग्य दिशा देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो हे विशेष होय. अण्णासाहेबांनी जीवनाच्या शेवटीपावेतो समाजाला ताठ मानेने उभे करण्याचे काम केले. समाज एकत्र राहण्यासाठी त्यांनी काम केले. शिक्षणक्षेत्र सोडले तर सहकारापुढे सद्यस्थितीत अनंत अडचणी आहेत. मात्र त्यावर मात करण्यासाठी आपण सदैव मदतीला तयार आहोत. परिसरातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण विरहित सर्व घटकांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे विचार त्यांनी व्यक्त केले.
तत्पूर्वी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांचा मोबाईल संदेश ध्वनिक्षेपकावरून ऐकविण्यात आला. यावेळी तापी खोरे विकास महामंडळाचे नाव अण्णासाहेब पी.के.पाटील तापी खोरे विकास महामंडळ असे करावे या आशयाच्या मागणीचे निवेदन कुढावद येथील शेतकरी भटू सखाराम चौधरी यांच्यासह शहादा परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना दिले.
प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांनी केले.सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ.विजयप्रकाश शर्मा यांनी मानले.डाॅ.कांतीलाल टाटिया यांनी संस्थेचा परिचय करून दिला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विद्याशाखांचे प्राचार्य व समिती सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.