नंदुरबार l प्रतिनिधी
आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक संदर्भात शिवसेना शिंदे गटाची बैठक संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. येणारी निवडणूक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची असून, कार्यकर्त्यांनी एकदिलाने उमेदवारांच्या यशासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन आ.रघुवंशींनी केले.
नंदुरबार तालुक्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी आमदार कार्यालयात घेण्यात आली. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. प्रसंगी आ.रघुवंशी म्हणाले, आगामी कालावधीत होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घ्यावे. आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून उमेदवार कसा विजय होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. यंदाची निवडणूक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची असून जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहायला हवे.
यावेळी जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण निघाल्यानंतर कार्यकर्त्यांनी लगेचच पक्षाचा कामाला लागावे. शिवसेनेकडून ज्यांना निवडणूक लढवायची असेल त्यांनी कागदपत्रांसह आमदार कार्यालयात संपर्क साधावा. शिवसेनेचा ऑनलाईन सदस्य नोंदणी नंतर आता सक्रिय सभासद नोंदणी करावी लागणार असून, नोंदणी करण्याचे आवाहन शेवटी ॲड.रघुवंशी यांनी केले.
बैठकीला जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील, रमेश गावित, शेतकरी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील,माजी नगराध्यक्ष रवींद्र परदेशी,जि.प सदस्य देवमन पवार,माजी सभापती विक्रमसिंह वळवी, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे,माजी पं.स उपसभापती प्रल्हाद राठोड,शेतकी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे,ज्येष्ठ शिवसैनिक ताराचंद माळसे, जि.प सदस्य अंबू पाडवी,बाजार समिती सभापती दीपक मराठे, मजुरी फेडरेशन सभापती अंकुश पाटील,रोहिदास राठोड,भरत पाटील, किशोर पाटील,नवीन बिर्ला,कमलेश महाले, संतोष साबळे आदी उपस्थित होते. बैठकीला नंदुरबार तालुक्यातील विविध ग्रामपंचायतचे सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.