नंदुरबार l प्रतिनिधी
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच दसरा उत्सवानिमित्त श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित राजे शिवाजी विद्यालयात सरस्वती पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलच्या दुसऱ्या मजल्याचे उद्घाटन करण्यात आले.
सदर प्रसंगी संस्था चालक संघटनेचे सचिव युवराज पाटील, सोसायटीच्या अध्यक्षा विद्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. गावित म्हणाले, “आजच्या समाजात वाढत चाललेला जातीय दुरावा शिक्षणाच्या माध्यमातूनच कमी करता येतो. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान नव्हे, तर समाजाबद्दलची बांधिलकी, राष्ट्रप्रेम आणि चांगले विचार यांचे रोपण करणे होय. आपण आवडत्या विषयात मनापासून शिक्षण घ्यावे, चांगल्या थोरामोठ्यांकडून प्रेरणा घ्यावी आणि गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वांवर चालूनच जातीय एकोपा जपावा,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील, मुख्याध्यापक शशिकांत पाटील, ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या पायल वंदना, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.