नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने महाराष्ट्रात “श्रीगणेशा आरोग्याचा” हा उपक्रम राबवण्यात आला असून जिल्ह्यात विविध गणेश मंडळांच्या माध्यमातून समुदाय आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. या अभियानाअंतर्गत 17 हजारहून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष डॉ. तुषार धामणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे
*शिबिरांमधील तपासणीची आकडेवारी:* संपूर्ण जिल्ह्यात एकूण 343 शिबिरे घेण्यात आली, ज्यात 17 हजार 202 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गरज असलेल्या व्यक्तींची रक्त तपासणीही करण्यात आली. या शिबिरात 5 हजार 597 पुरुष, 6 हजार 688 महिला, 2 हजार 352 लहान मुले आणि 2 हजार 565 लहान मुलींची तपासणी करण्यात आली.
*रुग्ण संदर्भ व रक्तदान शिबिरे:* या शिबिरांमधून 317 रुग्णांना पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले. काही गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरेही आयोजित केली, ज्यात एकूण 318 रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या.
*अधिकारी व मान्यवरांचा सहभाग:* नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी प्रत्यक्ष शिबिरांना भेट देऊन नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची सविस्तर माहिती घेतली. शिबिरांमध्ये आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, ईसीजी, रक्त तपासणी, औषधी वितरण आणि तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी यासारख्या सुविधा उपलब्ध होत्या.
*उपक्रमातील सहभागी संस्था व व्यक्ती:* जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने व गणेश मंडळांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे जिल्हा समन्वयक डॉ. योगेश सरताळे आणि जिल्हा कक्ष अध्यक्ष डॉ. तुषार धामणे यांनी गणेश मंडळे व रुग्णालयांना भेटी देऊन त्यांना या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. धर्मदाय रुग्णालये, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नित रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांनीही यात सक्रिय सहभाग घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांचे प्रत्यक्ष सहभाग आणि बहुमोल मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले, असेही मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष डॉ. धामणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.