नंदुरबार l प्रतिनिधी-
राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज नंदुरबार जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच तरंगता दवाखान्यांना भेट देवून सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयांची स्थिती, औषध पुरवठा, स्वच्छता तसेच रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी आमदार आमश्या पाडवी, आरोग्य उपसंचालक (नाशिक विभाग) डॉ. कपील आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
*अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय*
अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन माननीय मंत्री महोदयांनी सर्व वॉर्डची चौकशी केली. रुग्णालयात आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी आमदार आमश्या पाडवी यांचे बंधू महारु फुलजी पाडवी उपचार घेत असल्याचे पाहून मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, “एक आमदारांचे भाऊसुद्धा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत, यावरून सर्वसामान्यांसाठी या रुग्णालयांची महत्त्वाची भूमिका स्पष्ट होते.”
*डाब प्राथमिक आरोग्य केंद्र*
डाब येथे भेट दिली असता, मंत्री श्री. आबिटकर यांनी सिकलसेल आजारावरील औषधांचा पुरवठा सर्वाधिक या रुग्णालयात करावा असे निर्देश दिले. कारण या भागात आदिवासी मुलांची वसतीगृहे असल्याने रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
*मोलगी ग्रामीण रुग्णालय*
मोलगी येथील रुग्णालयाची पाहणी करताना स्वच्छतेच्या बाबतीत झालेल्या त्रुटींवर त्यांनी गंभीर नाराजी व्यक्त केली. साफसफाई ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच आतापर्यंत झालेल्या वस्तू खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याच्या सूचना आरोग्य उपसंचालकांना दिल्या.
*बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र*
बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीत मंत्री श्री. आबिटकर यांनी सर्पदंशावरील औषधांचा पुरवठा तातडीने करण्यात यावा, कायमस्वरूपी अतिरिक्त साठा ठेवण्यात यावा असे निर्देश दिले.
*इतर भेटी*
याशिवाय मंत्री प्रकाश आबिटकर यांनी भुषा (ता. धडगाव) येथील तरंगता दवाखान्याची पाहणी करुन डोंगराळ व दुर्गम भागात बोट ॲम्युलन्सने पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा तत्पर कशा पुरविता येतील याबाबत निर्देश दिले.
या संपूर्ण दौऱ्यात आरोग्यमंत्री यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णालयातील अडचणी समजावून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. “जनतेला उत्तम आरोग्यसेवा मिळवून देणे हीच सरकारची सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे,” असे ते यावेळी म्हणाले.