नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा शिक्षक पुरस्कार सन 2024-25
प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार विभागा मार्फत जिल्हा शिक्षक पुरस्कार सन 2024-25 चे वितरण डॉ. मित्ताली सेठी जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या हस्ते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मुख्य उपस्थितीत वितरण जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोल्हे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडून डॉ. राजेंद्र महाजन, उपशिक्षणाधिकारी वंदना वळवी, निलेश लोहकरे, डॉ. युनूस पठाण, भावेश सोनवणे तसेच सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी आणि सत्कारार्थी शिक्षक, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, सत्कारार्थी शिक्षकांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील वीर शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी केले. मान्यवर मनोगतातून डायट नंदुरबारचे डॉ. राजेंद्र महाजन यांनी मार्गदर्शन केले. सत्कारार्थी शिक्षकांमधून प्रमोद बोरसे आणि जयवंती चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण दाभाडे यांनी केले. तर आभार प्राथमिक उपशिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी मानले. कार्यक्रमात राज्यगीत, स्वागतगीत व राष्ट्रगीत सवाद्य सादर केल्याने एस.ए.मिशन मराठी शाळेचे प्रसाद दिक्षीत यांचा तसेच रिमोट द्वारे दिपप्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण यशस्वी केल्याने एकलव्य विद्यालयाच्या प्रज्ञा वडनगरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आपल्या मार्गदर्शक मनोगतातून जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना व त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील इतर शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोषक शालेय वातावरण निर्माण करुन विद्यार्थ्यांच्या अध्ययनातून त्यांचे भविष्य उज्वल करण्याचे आवाहन केले. तसेच या सोहळ्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना नवे बळ मिळून शिक्षण क्षेत्रात अधिक सकारात्मक वातावरण निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी जिल्ह्यातील शिक्षकांनी आपल्या उत्तम कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी केलेल्या योगदानामुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा जिल्हा शिक्षक पुरस्काराच्या माध्यमातून प्रातिनिधीक सत्कार होत असल्याचे सांगून शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांमध्ये जास्तीत जास्त भौतिक सुविधा देण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी तथा कार्यक्रम समन्वयक रमेश गिरी, मयुर वाणी, स्वच्छतादूत सुनिल पाटील, योगेश रघुवंशी, आसिफ पठाण, इसरार सैय्यद, शितल भदाणे, प्रविण पवार यांनी परिश्रम घेतले.
*सत्कारार्थी शिक्षक-*
1) नंदुरबार तालुका-श्रीम. रंजना गुंड्या साबळे जि.प. शाळा, नांदर्खे
2) नवापूर तालुका- श्री. दिलीप नरशी गावीत जि.प. शाळा, बोरवण
3) शहादा तालुका- श्रीम. मनिषा सखाराम सोनवणे जि.प. शाळा, लोहारा
4) तळोदा तालुका- श्रीम. जयवंती गुरा चौधरी जि.प. शाळा, रोझवा पु. क्र.4
5) अक्कलकुवा तालुका- श्री. फहिम अख्तर शेख सिकंदर जि.प. शाळा, मक्राणीफळी (उर्दु)
6) धडगांव तालुका- श्री. प्रमोद निंबा बोरसे जि.प. शाळा, जुने धडगांव








