नंदुरबार l प्रतिनिधी-
गेल्या तीन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. सातपुड्यातील दुर्गम भागात पावसामुळे रस्ते वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला जाण्यासाठी रस्त्यात असलेल्या सातपायरी घाटातील दरड कोसळल्याने रस्ता बंद असल्याने तोरणमाळ संपर्क तुटला आहे.
सातपुड्यात तीन दिवसापासून पावसाने झोडपले. तोरणमाळ परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या तोरणमाळ ला जाण्यासाठी शहादा ते तोरणमाळ हा 56/ 200 क्रमांकाच्या रस्त्यावर प्रसिद्ध सात पायरी घाट आहे. या घाटात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास दरड कोसळल्याने भले मोठे दगड रस्त्यावर आल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे तोरणमाळ शी संपर्क तुटला आहे कालापानी ते तोरणमाळ यांना जोडणारा हा रस्ता आहे. तसेच प्रसिद्ध असलेला यशवंत तलाव ही ओव्हर फ्लो झाला आहे. तर अक्कलकुवा तालुक्यातील जांगठी ते मनीबेली व जांगठी चिमलखेडी रस्त्यावर ही दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे नर्मदा काठावरील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
*सतर्कतेचा इशारा*
नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक, नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या लघुपाटबंधारे योजना देवळीपाडा, ता. नवापूर, जि. नंदुरबार या धरण क्षेत्रात आणि पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. या अनुषंगाने, सदर प्रकल्पातील पाणी पातळी ९७.०० मीटर वर पोहोचली असून, प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. सद्यस्थितीत धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी, प्रकल्पाखालील नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनामार्फत देवळीपाडा,चितवी, केळी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.