सैनिकी शाळेच्या २१ व्या वर्धापन दिनी माजी विद्यार्थ्यांनी गायले शाळा व शिक्षकांचे गुणगान
नंदुरबार l प्रतिनिधी
पथराई ता. नंदुरबार येथील के.डी.गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात २१वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने शाळेत माजी विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
एक सप्टेंबर २००४ या दिवशी सैनिकी विद्यालयाची स्थापना झाली. नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव असलेल्या सैनिकी शाळेने गेल्या २१ वर्षात विविध सन्मान प्राप्त केले. विद्यालयाने शिस्त,गुणवत्ता, देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा,सामाजिक बांधिलकी यांचा बळावर आदर्श विद्यार्थी घडवत जिल्ह्यात नावलौकिक मिळवला.
त्यामुळेच आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्रकुमार गावित होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विभूती गावित, ऋषिका गावित, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत मराठे, माजी शिक्षणाधिकारी देविदास बोरसे उपस्थित होते.
याप्रसंगी इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षक,फार्मासिस्ट, आरपीएफ, थलसेना, महसूल विभाग, राजकारण आणि समाज सेवा इत्यादी क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला.
आपल्या सत्काराला उत्तर देताना माजी विद्यार्थ्यांनी आपण आज जे काही यश मिळवले आहे त्याचे श्रेय हे शाळेला व येथील शिक्षकांना आहे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी श्री.बोरसे तसेच लेफ्टनंट कर्नल श्रीकांत मराठे यांनी प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात गावित यांनी सैनिकी शाळेच्या स्थापनेपासून शाळेने केलेली प्रगती सांगतानाच येथील माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेलं यश पाहून आपणास खरोखरच समाधान वाटते असे मत व्यक्त केले. व पुढील जीवनात विद्यार्थ्यांनी कार्यरत राहण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शरद पाटील यांनी केले. प्रल्हाद संदानशिव व श्रीमती रजनी करेले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय काळे यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रल्हाद संदानशिव,उमाकांत पाटील,प्रा. अमरजीत आरंभी, श्रीमती नीलिमा पवार व काशिनाथ सूर्यवंशी यांनी केले.