नंदुरबार l प्रतिनिधी-
शिवण (विरचक) मध्यम प्रकल्प, ता. जि. नंदुरबार या धरणाच्या व पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणात जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत धरणाची पाणी पातळी २३८.३० मीटर इतकी नोंदवण्यात आली असून, ही पातळी धरणाच्या पूर्ण संचय क्षमतेच्या (२३९.३० मी.) अगदी जवळ पोहोचली आहे.
पावसाचा जोर अजूनही सुरूच असल्यामुळे धरणात पाण्याचा येवा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाचे वक्रद्वारे (spillway gates) पाणी विसर्ग करण्याची शक्यता असून, यामुळे शिवण नदीत पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो.
नदीनिकट गावांना सतर्कतेचा इशारा:
शिवण नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून पुढील गावांतील नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी:
विरचक, पाटलीपाडा, खामगाव, बिलाडी, नारायणपुर, पापनेरपाडा, सुंदरदे, करणखेडा, बद्रीझिरा, राजापुर, भवाली, धुळवद, व्याहूर, नळवे बु., वेलदा, कविठे, नेवाली तसेच इतर नदीकाठावरील गावांनाही याचा संभाव्य धोका आहे.
नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी:
1. नदीपात्रात गुरे-ढोरे सोडू नयेत.
2. कोणत्याही व्यक्तीने नदीपात्रात प्रवेश करू नये.
3. लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे.
4. स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करावे.
5. आवश्यकता भासल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
प्रकल्प विभागाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, पाण्याचा विसर्ग केव्हा आणि किती प्रमाणात केला जाईल, याची माहिती स्थानिक प्रशासनाद्वारे वेळोवेळी दिली जाईल.