नंदुरबार l प्रतिनिधी-
अनंत चतुर्दशीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखणेकामी सज्ज झाला असून बंदोबस्तात अतिरिक्त फौजफाटा व स्वयंसेवकांचा सहभाग, सीसीटीव्ही व ड्रोनची विशेष नजर असणार आहे. त्याचप्रमाणे सोशल मिडीयावर लक्ष ठेवणेकामी सायबर सेल सक्रिय झाला आहे.
अनंत चतुर्थीच्या अनुषंगाने जिल्हयातील विविध ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणूक होणार असुन त्या सुयोग्य व शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून कायदा व सुव्यवस्था राखणेकामी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
गणेश विसर्जनासाठी मोठया प्रमाणावर नागरिक, भक्तगण व विविध मंडळांचे सहभाग हे अपेक्षित असल्यामुळे नागरी सुरक्षा, वाहतुक कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे जास्तीत जास्त पोलीस अधिकारी, अंमलदार, तसेच एस.आर.पी.एफ. प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स, आर.सी.पी. व क्यु.आर.टी. चे प्लाटून अशांसह होमगार्ड असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. तसेच अतिरिक्त बंदोबस्त देखील राखीव ठेवण्यात आला आहे. विशेषतः नंदुरबार शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावर विशेष लक्ष ठेवणेसाठी ठिकठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तसेच 10 किलोमीटर पर्यंत स्पष्टपणे दृश्य टिपणाऱ्या अशा ड्रोनची देखील व्यवस्था यावेळी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तरुण वर्गातील स्वयंउत्स्फुर्त अशा तरुणांची स्वयंसेवक म्हणुन मदत देखील घेतली जाणार आहे. मिरवणूक मार्गावरील गदर्दी नियंत्रणासाठी वाहतूक शाखेची विशेष व्यवस्था करण्यात आली असुन आपात्कालीन सेवेसाठी स्वतंत्र अशी पथके प्रशासनातर्फे सज्ज ठेवण्यात आली आहेत.
त्याचप्रमाणे सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट करुन जातीय तेढ निर्माण करणाऱ्या इसमांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असुन कोणालाही आक्षेपार्ह पोस्ट अथवा व्हिडीओ दिसुन आल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा सायबर पोलीस मो.क्र. 9028954535 यावर कळवावे.
“गणेश चतुर्थीचे दिवशी मिरवणूक ही सुरक्षिततेत व उत्साहात साजरी करण्यासाठी सर्वांनी परस्पर सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारचा धार्मिक वाद, अफवा किंवा गोंधळ निर्माण होऊ न देता पोलीस प्रशासनास सहकार्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आढळून आल्यास त्याबाबत नागरिकांनी जिल्हा पोलीस दलास कळवावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी केले आहे.