नंदुरबार l प्रतिनिधी
ग्रामीण भागाचा शाश्वत, सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळयासमोर ठेवून राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ सुरु करण्यात आले आहे. अभियानाच्या माध्यमातुन गावातील शेवटच्या माणसाला विकासाच्या प्रवाहात आणून गावे समृद्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. अभियनात ग्रामपंचायतीने सर्व ग्रामस्थांना सहभागी करुन घेवून लोकचळवळ निर्माण करावी व अभियान प्रभावीपणे राबवा असे आवाहन शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ च्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात ग्रामपंचायत विभागामार्फत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ बाबत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्याशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार राजेश पाडवी बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन आमदार पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, प्रकल्प संचालक राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) पांडूरंग कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) उदयकुमार कुसुरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण देवरे आदी उपस्थित होते. कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आमदार पाडवी पुढे म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासासाठी निश्चित केलेल्या 17 शाश्वत विकास ध्येयांची व “सर्वांना सोबत घेवून चला” याची उद्दिष्टपूर्ती करणेसाठी ग्राम विकास विभागाने हे अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे अभिसरण करुन गावाचा शाश्वत विकास करावा. यासाठी गावातील सरपंच, ग्रामस्थ यांनी प्रशासनाचे सहकार्य घेऊन आपले गाव समृद्ध करावे. प्रत्येक गाव हिवरेबाजार राळेगण सिद्धी व पाटोदा या आदर्श गावांप्रमाणे आपले गाव, तालुका व जिल्हा आदर्श करावा असे आवाहनही आमदार राजेश् पाडवी यांनी केले.
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ ची ग्रामस्तरावर प्रभावीपणे राबविण्यात यावे यासाठी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सर्व विभागप्रमुख तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांचेसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक ग्रामपंचायत विभगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी केले.
कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल म्हणाले की, अभियानात जिल्ह्यातील 100 टक्के ग्रामपंचायतीनी सहभाग नोंदवून शासन निर्णयाप्रमाणे गावात विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अभिसरण पध्दतीने शासनाच्या योजनांची सांगड घालुन शेवटच्या माणसाचे जीवनमान उंचवावे. लोकसहभाग,लोकवर्गणीच्या माध्यमातुन शिक्षणसुविधा, आरोग्यसुविधा , सुशासन वाढवून गावाचा शाश्वत विकास करावा. या अभियानात राज्य व विभागस्तरावर जास्तीत जास्त ग्रामपंचायतींना पारितोषिके मिळतील यासाठी ग्रामपंचायतींनी उपक्रम राबविण्याचे नियोजन करावे असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी यावेळी केले. कार्यशाळेत अतिरक्ति मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, प्रकल्प संचालक राहुल गावडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत अभियानाचे मुख्य घटक सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांची अभिसरण करणे, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे, उपजिविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातुन लोकचळवळ निर्माण करणे या विषयावर प्रशिक्षक सुनिल कामडे, परमेश्वर गंडे, निता पाटील, लिलेश्वर खैरनार, मुकेश कापुरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जयनगर येथील उपसरपंच ईश्वर माळी यांनी ‘जयनगर ग्रामपंचायतीची आदर्श गावाकडे वाटचाल’ याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेचे सुत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी मुकेश कापुरे यांनी केले.








