नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असून नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज बुधवारी नंदुरबार येथील भाजपा जिल्हा कार्यालय विजयपर्व येथे भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, भाजपचे आमदार राजेश पाडवी, मालेगांव जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी,कैलास चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन खानवाणी, डॉ.सपना अग्रवाल, शहराध्यक्ष नरेश कांकरीया, भिमसिंग राजपुत, युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत पाटील, प्रेम पाटील, धानोरा मंडलाध्यक्ष गणेश चव्हाण सह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या दहा दिवसापासून भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे. चार दिवसापूर्वी दि.31 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या कार्यकर्त्या डॉ.समिधा नटावदकर तर दि.1 सप्टेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाचे दोन नगरसेवकांसह 117 शिवसैनिकांनी केलेला भारतीय जनता पार्टीत प्रवेश आणि आज शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि 134 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत केलेल्या प्रवेश नंदुरबार जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे
भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे भाजपाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत विकसित देश व महाराष्ट्रासाठी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत आहेत. जनतेचा केवळ भारतीय जनता पार्टीवर विश्वास असून अनेक कार्यकर्ते आमच्या नेत्यांच्या कामावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करीत आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीप्रमाणे सांभाळून घेऊ व त्यांना विश्वासात घेऊन आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यापुढे देखील मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीत अनेक पक्षाचे कार्यकर्ते येणार असून काँग्रेस सह विरोधी पक्षातील कार्यकर्ते त्या पक्षाच्या झेंडा लावण्यासाठी सुद्धा शिल्लक राहणार नाही असा विश्वास विजय चौधरी यांनी व्यक्त केला.
दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीत इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा होणारा पक्षप्रवेश चर्चेत आला आहे. प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचे कुशल संघटन व कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे अतूट नाते, यामुळे देखील इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी प्रती मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
आजच्या पक्षप्रवेश प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार च्या सौ.मंजुळाताई पाडवी (महिला जिल्हाध्यक्षा नंदुरबार – श. प. गट), डॉ. राजेंद्र ठाकरे (जिल्हाध्यक्ष आदिवासी सेल), रविंद्र नाईक (तालुका अध्यक्ष नंदुरबार आदिवासी सेल), जंगलसिंह पाडवी (तालुकाध्यक्ष तळोदा), शिवाजी वसावे (तालुकाध्यक्ष अक्कलकुवा), गुलाबसिंग पाडवी (जिल्हा उपाध्यक्ष), अनिल पाडवी (तालुका अध्यक्ष नवापूर), विकास वसावे (जिल्हा सचिव नंदुरबार) रीना वसावे (ग्रामपंचायत सदस्य) यांच्यासह नंदुरबार तालुक्यातील लोणखेडा व लोय ग्रामपंचायत, तळोदा तालुक्यातील लाखापुर, चिनोदा ग्रामपंचायत, तसेच नवापूर तालुक्यातील खेरवा ग्रामपंचायत येथील आजी-माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह 134 कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.