नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तसेच खेलो इंडिया व ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या जिल्ह्यातील खेळाडूंचा सत्कार 29 ऑगस्ट, 2025 रोजी दुपारी 4 वाजता करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त 29 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे जिल्ह्यातील खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंनी आपली नावे 25 ऑगस्ट, 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात प्रमाणपत्रासह सादर करावी, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.