नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी संत गुलाम महाराज यांची शिकवण जागृत ठेवण्यासाठी ‘आप की जय’ परिवारातील भाविक दरवर्षी श्रावणातील शेवटच्या आठवड्यात गावागावातून पायी दिंडीने रंजनपुर येथे रवाना होत असतात. त्यानुसार यंदाही मोठ्या संख्येने भाविक या दिंडीमध्ये सहभागी झाले असून महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी स्वतः पायी चालून या दिंडीमध्ये सहभाग घेतला.
प्रथेनुसार नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागातून तसेच गुजरात सीमेवरच्या गावांमधून पायी दिंडी द्वारे असंख्य भाविक तळोदा तालुक्यातील रंजनपुर येथे गुलाम महाराज यांच्या समाधीस्थळी येत असतात. त्या ठिकाणी श्रावण महिन्यातील अखेरच्या अमावस्येला सामूहिक प्रार्थना आरती आणि मोठा सोहळा पार पडतो. त्यानुसार श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी म्हणजे 18 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास हातोडा पूल या ठिकाणाहून या दिंडीचे दर्शन घेत राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी पायी दिंडीत आपला सहभाग घेतला.
या दिंडीत मा. खासदार डॉ हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित आपकी जय परिवाराचे जितु महाराज आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी दिंडीतील संत गुलाम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मनोभावे प्रार्थना केल्या.
त्यानंतर अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, 1937 मध्ये आप की जय परिवाराच्या माध्यमातून संत गुलाम महाराज यांनी आदिवासी समूहाला जागृत करण्याचे मोठे कार्य सुरू केले होते. व्यसनमुक्ती, साक्षरता, आरोग्य रक्षण, संघटन आणि श्रद्धापूर्वक आचरण याचे महत्त्व प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्यासाठी ते गावागावात जाऊन प्रवचन घेत असत. ज्यामुळे आदिवासी समूहाच्या प्रगतीला चालना मिळाली. तेच कार्य आजही दिंडीच्या माध्यमातून जिवंत ठेवले जात आहे आपकी जय परिवाराचे कार्य म्हणूनच खूप कौतुकास्पद आहे; असे डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले.