नंदुरबार l प्रतिनिधी
अल्पसंख्यांक विकास खात्याची जबाबदारी मला मिळाली आहे. मी काम करणारा मंत्री आहे. केवळ आश्वासन देवून मी थांबत नाही. मुस्लीम अल्पसंख्यांक समाजाच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या पुर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन. मुस्लीम समाजाच्या मुलींच्या वस्तीगृहाचा प्रश्न मार्गी लावीन., असे आश्वासन क्रीडा युवक कल्याण तथा अल्पसंख्यांक विकास मंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार शहरातील इलाही चौकात मुस्लीम अल्पसंख्यांक समाजाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे हे होते. तर व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आरीफ शेख, शोयेब खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ माधवराव चौधरी, रतन पाडवी,शहराध्यक्ष मोहन रायभान माळी, मोहन शेवाळे, नरेंद्र नगराळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सिमा सोनगरे, इंजि जेलसिंग पावरा, , मालती वळवी, अजहर मिया जहागिरदार, सैय्यद मुजाहीद, सिकंदर कुरेशी, गुडडू काकर, जाकीर मिया, जगदीश जायस्वाल, प्रदीप मराठे, अनिल चौधरी, संगिता पाडवी, शिंपी, प्रतिभा कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
माणिकराव कोकाटे म्हणाले, आपण मला काम सोपवा, दरगाहच्या उरुसमध्ये काही कमी असेल तर ते मी काम करेन. मुलींच्या वस्तीगृहाचा प्रश्न सोडवीन, सर्व कामे करण्याचे मी आश्वासन देतो, शाळेच्या मुला मुलींचा शिष्यवृत्तीचा प्रश्न सोडविन, निर्दोष युवकांवर गुन्हे दाखल होणार नाहीत याची मी काळजी घेईन. कुरेशी बांधवांच्या काही मागण्या आहेत त्या पुर्ण करेन. अल्पसंख्यांक विकास खात्यात आलेल्या निधींमध्ये नंदुरबार जिल्हयातील अल्पसंख्यांक बांधवांना जास्तीत जास्त निधी देण्यावर माझा भर राहील, असेही त्यांनी सांगितले. कुठलाही धर्म वेगळा नाही. प्रत्येक धर्मियांनी या देशात गुण्यागोविंदांनी राहिले पाहिजे. असे राष्ट्रवादी पक्षाचे धोरण आहे. इमाम बादशाह दरगाहवर काही बांधवांनी मीच नंदुरबारच्या पालकमंत्रीपदी रहावे अशी मन्नत मानली होती. त्या बांधवांचे मी आभार मानतो. अल्पसंख्यांक विकास खाते मिळताच रक्षा बंधनाची राखी मी माझ्या मानलेल्या मुस्लीम भगीनीकडून बांधली., असेही त्यांनी आवर्जून सांगितले. अल्पसंख्यांक आर्थिक महामंडळ अधिक सक्षम बनवून युवकांना त्यातून रोजगार दिला जाईल. पोलिसांकडून आकस बुद्धीने युवकांवर गुन्हे दाखल होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. जेणेकरून लोकांची भविष्य खराब होणार नाही, असेही त्यांनी आश्वस्त केले.
डॉ अभिजित मोरे म्हणाले, अल्पसंख्यांक विकास विभागामुळे माणिकराव कोकाटे यांच्यामुळे डबल इंजिन मिळाले आहे. शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचल्या पाहिजे असे कोकाटे यांचे धोरण आहे. राज्यात सर्वात जास्त काम करणारा मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संविधानावर चालते, सर्व धर्म समभाव हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. युनुसभाई करणखेडा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर शोयेब खाटीक यांनी आभार मानले. प्रत्येक तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने वेगवेगळ्या संघटनांनी माणिकराव कोकाटे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बांधवांच्या समस्या मांडण्यात आल्या.