नंदुरबार पोलिसांनी केली विविध गुन्ह्यांची उकल,5 जणांना अटक
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याकडून मागील पाच दिवसात 5 गुन्हयांची उकल केली असून घरफोडीचा 1 तर चोरीचे तब्बल 4 गुन्हे उघड, एकुण 2 लक्ष 81 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, त्यात 9 चोरीची वाहने तर एकुण 5 आरोपी ताब्यात घेण्यात आले.
जिल्हयाभरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच पोलीस ठाणे हद्दीतील शरिराविरुध्दच्या तसेच मालमत्तेविरुध्दच्या गुन्हयांचा शोध घेऊन त्यामध्ये जास्तीत जास्त उत्कृष्ट कामगिरी करण्याबाबतच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना वेळोवेळी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने शहर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच दिवसात लागोपाठ 5 गुन्हयांचा तपास करीत आरोपींना ताब्यात घेतले आहे, त्यामध्ये विशेषतः 1 घरफोडी व 4 चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात शहर पोलीस ठाण्यास यश मिळाले आहे,
त्यामध्ये सविस्तर असे की 5 जुलै व 7 जुलै 2025 रोजी शहर पोलीस ठाणे येथे भा. न्या. संहिता कलम 303(2) प्रमाणे चोरी बाबत दाखल गुन्हयांमधील मिळालेल्या गोपनिय माहितीप्रमाणे सदर गुन्हयातील आरोपी बंटी ऊर्फ राकेश प्रभाकर मराठे रा.प्लॉट नं. 27, फकिरा शिंदे नगर, कोरीट नाका रोड, ता.जि. नंदुरबार, लक्ष्मणभाई ऊर्फ लखन अंबालाल चौधरी रा.सेवाग्राम नगर, डि मार्ट जवळ, ता.जि. नंदुरबार यांनी केला असल्याचे निष्पन्न होऊन आरोपी क्रमांक 1 याच्या ताब्यातुन गुन्हयातील मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे, तसेच नमुद आरोपीना अधिकचे विश्वासात घेऊन माहिती घेता त्यांच्याकडून नंदुरबार शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरी केलेल्या एकुण 7 मोटारसायकली अंदाजे 2 लक्ष 25 हजार रुपये किमतीच्या जप्त करण्यात आल्या आहेत, त्याचप्रमाणे 6 जुलै 2025 रोजी शहर पोलीस ठाण्यात भा.न्या. संहिता कलम 303(2) प्रमाणे दाखल चोरीच्या गुन्हयात मिळालेल्या गोपनिय माहिती व पुराव्यांच्या आधारे संशयित इसम नामदेव रघुनाथ माळी रा. नंदुरबार यास पथकाने ताब्यात घेऊन विचारपुस करता त्याने वर नमुद गुन्हयाबाबत कबुली देऊन गुन्हयात चोरलेली रिक्षा हि चाळीसगाव येथे इसम अन्वर अली असगर अली सैय्यद, रा. चाळीसगाव रोड, धुळे यास विकली असल्याचे सांगितले.
त्यावरुन शहर पोलीस गुन्हे शोध पथकाने नमुद दोन्ही आरोपीना ताब्यात घेऊन त्यांचेकडुन 25 हजार रुपये किमतीची एक ऑटो रिक्षा जप्त केली आहे, तसेच दि. 8 जुलै 2025 व दि. 9 जुलै 2025 रोजी शहर पोलीस ठाण्यातील भा.न्या. संहिता कलम 303(2) प्रमाणे दाखल चोरीचे गुन्हयात मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे संशयित इसम चेतन अरुण अहिरे रा. ब्राम्हणगाव, ता. सटाणा, जि. नाशिक हा धुळे चौफुली परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने शहर पोलीसांनी सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकल बाबत विचारता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, त्यामुळे त्याच्यावर अधिकचा संशय बळावल्याने त्यास विश्वासात घेऊन विचारणा करता त्याने मागील काही दिवसांपूर्वी एका दारुचे दुकाना जवळून मोटारसायकल चोरी केले असल्याची कबुली दिली तसेच त्याचेकडून अधिकची माहिती घेता त्याने एका दारुचे दुकानात रात्रीचे वेळी बेकायदेशीररित्या प्रवेश करुन दारु देखील चोरी केले असल्याचे सांगितल्याने घरफोडीच्या गुन्हयाची उकल होऊन सदर आरोपीकडून एकुण 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात शहर पोलीसांना यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, पोउपनि विकास गुंजाळ, पोहेको दिपक बुनकर, नरेंद्र चौधरी, पंकज महाले, भटू धनगर, मपोकों निंबाबाई वाघमोडे, रोहिणी धनगर, पोकोंप्रविण वसावे, राहूल पांढारकर, किरण मोरे, भगवान मुंडे, हरिष कोळी, ललित गवळी अशांनी केली आहे.