नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहर जिल्ह्याचे मुख्यालय असून 1 जुलै रोजी नंदुरबार जिल्हा निर्मितीस 27 वर्षे पूर्ण होत आहेत. जिल्हा शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी सिटिबस सेवा नसल्याने याबाबत प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष आणि ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य महादू हिरणवाळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. या मागणीला यश आले असून येत्या 15 ऑगस्टपासुन नंदुरबार शहरात दोन सिटी बस सुरू होणार आहेत.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र प्रवासी महासंघातर्फे पत्र दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी माहिती दिली.नंदुरबार जिल्हा निर्मिती झाल्यानंतर विविध शासकीय कामा निमित्त नंदुरबार जिल्ह्यातून नागरिकांचे येणे- जाणे सुरू आहे.
ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा रुग्णालय, आरटीओ कार्यालय, मध्यवर्ती कारागृह, आदिवासी प्रकल्प कार्यालय, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, पासपोर्ट कार्यालय आदी कार्यालय शहरापासून लांब आहेत. यामुळे या ठिकाणी पोहोचण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक बससेवा उपलब्ध होण्याबाबत यापूर्वीही ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघातर्फे निवेदन देण्यात आले.
नगर पालिका आणि राज्य परिवहन महामंडळाचे धुळे विभागीय नियंत्रक तसेच नंदुरबार आगार प्रमुख यांना सिटी बस बाबत पत्र देण्यात आले. याशिवाय नवापूर, साक्री, नाशिक, मार्गावर धावणाऱ्या सर्व बसेस मधून बस स्थानक ते नवापूर चौफुली पर्यंत प्रवाशांना चढ-उतार होणे बाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात. तसेच डॉ. दीनदयाल चौक, स्टेट बँक व नाट्य मंदिर स्टॉप, धुळे चौफुली, नवापूर चौफुली, धानोरा रोड, करण चौफुली, जगतापवाडी आदी ठिकाणी प्रवाशांना थांबण्यासाठी प्रवासी निवारा उभारण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे.
ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी संचलित प्रवासी महासंघातर्फे जनहितासाठी कार्य सुरू आहे. जिल्हा निर्मितीच्या 27 वर्षात सिटीबस सेवा बंद असून ती तातडीने सुरू करण्याची मागणी आहे.
– महादू हिरणवाळे,
महाराष्ट्र प्रवासी महासंघ,
तालुकाध्यक्ष, नंदुरबार
नंदुरबार शहरातील सिटी बस सेवेबाबत जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री महोदयांनी मंजुरी दिली आहे.परिवहन मंडळातर्फे एक इलेक्ट्रिक बस आणि पालिकेतर्फे एक अशा दोन सिटी बस तातडीने सुरू करण्यात येईल.
– डॉ. मिताली सेठी, जिल्हाधिकारी नंदुरबार