नंदुरबार l प्रतिनिधी-
सरपंचावर दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या बैठकीत जात असताना रस्त्यावर दगड टाकून सदस्यांच्या गाडीवर जमावाने हल्ला करीत सदस्यांना मारहाण करत डांबून ठेवले. गाडीची तोडफोड करत काही सदस्यांना दरीजवळ घेऊन ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार येथे घडली या प्रकरणी फिर्यादीवरून 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार येथील सरपंचाविरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठरावाचे प्रस्ताव दिला होता त्यानुसार सल्लीबार येथे सरपंचविरुद्ध अविश्वासावर निर्णय घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रस्ताव दाखल करणारे सदस्य एका वाहनाने (क्र. एम.एच.१५,एएस ५८९३) ग्रामपंचायत कार्यालयात येत असताना सरपंच गटातील जमावाने गावात रस्त्यावरच वाहन अडवून त्यावर दगडफेक करीत गाडीची तोडफोड केली. त्या गाडीत बसलेल्या ग्रामपंचायत सदस्य लालसिंग सेमट्या वळवी व इतर सदस्यांना वाहनाखाली उतरवून मारहाण करीत धमकी देत सोबत घेऊन गेले.
काही ग्रामपंचायत सदस्यांना काठीने मारहाण करण्यात आली. त्यातील काही सदस्यांना घरामध्ये डांबून ठेवण्यात आले. काही सदस्यांना दरीच्या कडेला नेऊन दरीत फेकून देत ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी लालसिंग वळवी यांच्या फिर्यादीवरून वीरसिंग भुरा वळवी, योगेश धीरसिंग वळवी, धीरसिंग सिंगा वळवी, डेबा विज्या वळवी, दामा सिंगा वळवी, छगन धीरसिंग वळवी, गणेश धीरसिंग वळवी, खाद्या पारशी वळवी, भोगा परशी वळवी, कांतिलाल फुलसिंग वळवी, हात्या बाज्या वळवी, कमलाकर पेचरा वळवी, नितीन भाद्या वळवी, मगन धीरसिंग वळवी आदी १७ जणांविरूद्ध मोलगी पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गाडी लोहार करीत आहेत.