मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य
नंदुरबार l प्रतिनिधी
विश्व योग दिनाचे औचित्य साधून विश्व योग संयोजन समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दि. 21 जून रोजी सकाळी सात वाजता जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य योग शिबिर पार पडले. माजी खासदार महा संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांची या शिबिरात प्रमुख उपस्थिती होती. मैदानावर स्वतः उपस्थित राहून त्यांनी सहभाग घेतला आणि सर्व योगासने करीत योगाभ्यास केला आणि त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांसह नागरिकांशी त्यांनी संवाद केला.
त्याआधी डॉक्टर हिना गावित यांनी विश्व योग दिनाच्या शुभेच्छापर भाषणात सांगितले की, अंतर्मनाची आणि शरीराची निगा राखण्याच्या दृष्टिकोनातून योगाभ्यास किती महत्त्वाचा आहे, हे पंतप्रधान मोदीजी यांच्यामुळेच जगाला माहीत झाले. त्यांच्या प्रेरणेतूनच योग प्रशिक्षणाचे उपक्रम सुरू झाले आहेत. तथापि सर्व घटकांनी या उपक्रमांच्या माध्यमातून एकत्र येणे आणि केवळ 21 जून या एकाच दिवशी योग न करता वर्षातील 365 दिवस प्रत्येकाने करणे अपेक्षित आहे; असेही डॉक्टर हिना गावित म्हणाल्या.
विश्व योग संयोजन समिती,जिल्हाधिकारी कार्यालय, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमा न्यास, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गायत्री परिवार, जी. टी. पाटील महाविद्यालय,शिक्षण अधिकारी माध्यमिक व प्राथमिक, जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या सहकार्याने अकराव्या योग दिनानिमित्त हे एक दिवसीय योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. योगासने, सूक्ष्म व्यायाम यांचे प्रशिक्षण याप्रसंगी देण्यात आले. पतंजली योग समिती महाराष्ट्र राज्य पूर्वचे प्रभारी नांदेड येथील अनिल अमृतवार यांनी योग संदर्भात प्रमुख मार्गदर्शन केले.
भारत स्वाभिमान न्यासाचे जिल्हा प्रभारी नवनीत शिंदे, पतंजली योग समितीचे एन. डी. माळी, एस एन पाटील, जीटीपी महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र रघुवंशी, गायत्री परिवाराचे शालिग्राम पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच योग समितीचे प्रसिद्धीप्रमुख महादू हिरणवाळे उपस्थित होते.
आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी सांगितले योगाचे महत्त्व
जागतिक योग दिवसानिमित्त डीएसके सभागृहात भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित योग शिबिराला राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांनी विविध योगाभ्यास देखील केला. या शिबिराला भाजपा महामंत्री विजय चौधरी, शहराध्यक्ष नरेश कांकरिया, योग गुरु नरेंद्र सोनी, योग गुरु अमित जैन, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर धामणे आदि उपस्थित होते. या शिबिरात उपस्थित विद्यार्थी नागरिकांना आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी योगाचे महत्त्व या संदर्भात माहिती दिली.