नंदुरबार l प्रतिनिधी
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील जिल्ह्यातील १२ लाख ५१ हजार ७४९ लाभार्थ्यांचे ई-केवायसी (e-KYC) (लाभार्थी प्रमाणीकरण) करणे बंधनकारक असून त्यातील ८ लाख १९ हजार २० लाभार्थ्यांनी (७०.४६ टक्के) आपली ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली आहे, तसेच ३ लाख ६९ हजार ८२९ (२९.५४ टक्के) लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
ई-केवायसी (e-KYC) प्रणाली आधार क्रमांक संलग्न शिधापत्रिकेमध्ये नमूद योग्य व्यक्ती असल्याची खात्री करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याची आणि शिधापत्रिकेमध्ये नमूद असलेल्या व्यक्ती त्याच असल्याची खात्री केली जाते.
लाभार्थी आपले ई-केवायसी (e-KYC) दोन प्रकारे करू शकतात यामध्ये जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीनद्वारे मोफत केली करता येईल. तसेच शासनाने जनतेच्या मागणीनुसार ‘मेरा ई-केवायसी’ (Mera E-KYC) मोबाईल ॲप कार्यान्वित केले आहे, ज्यामुळे लाभार्थी स्वतःहून काही मिनिटांत आपले आणि कुटुंबातील सर्व लोकांचे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करू शकतात.
‘मेरा ई-केवायसी’ मोबाईल ॲप वापरण्याची प्रक्रिया:
• गुगल प्ले स्टोअरमधून “आधार फेस आरडी सेवा ॲप” (Aadhaar Face RD Service app) शोधा आणि आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.
• त्यानंतर “मेरा ई-केवायसी मोबाईल ॲप” (Mera E-KYC app) इन्स्टॉल करा.
• ॲप उघडल्यानंतर राज्य निवडा आणि ठिकाण टाका.
• आधार क्रमांक टाकल्यानंतर मोबाईलवर ओटीपी (OTP) प्राप्त होईल, तो दिलेल्या रकान्यात टाका.
• माहिती भरल्यानंतर ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा.
• मोबाईल स्क्रीनवर दिसणारी माहिती ‘व्हेरीफाय’ करा आणि ‘सबमिट’ करा.
• त्यानंतर ‘फेस ई-केवायसी (e-KYC)’ वर क्लिक करा.
• सेल्फी कॅमेरा उघडल्यावर डोळे मिटा आणि उघडा. फोटो काढल्यानंतर ई-केवायसी e-KYC पूर्ण होईल आणि तुम्हाला तसा मेसेज दिसेल.
सध्या जिल्ह्यात ३ लाख ६९ हजार ८२९ लाभार्थ्यांची ई-केवायसी (e-KYC) प्रलंबित असून जिल्ह्यातील ज्या अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांची ई-केवायसी (e-KYC) प्रलंबित आहे अशा लाभार्थ्यांनी आपल्या रास्तभाव दुकानातून किंवा ‘मेरा ई-केवायसी’ (Mera E-KYC) या ॲपवरून 20 जून 2025 पावेतो ई-केवायसी (e-KYC) करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.