नाशिक l प्रतिनिधी-
आगामी पावसाळी कालावधीत नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांमी सज्ज राहावे आणि नागरिकांना जेथे आवश्यक असेल तेथे तत्काळ मदत मिळेल, यादृष्टीने नियोजन करावे, आशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात विभागातील पाचही जिल्ह्यांचा आढावा घेतला. पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जलसंपदा, महावितरण, कृषी, महसूल, आरोग्य, पाटबंधारे यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
डॉ. गेडाम म्हणाले की, सर्व विभागांनी त्यांचा आपत्कालीन आराखडा तयार करावा. संभाव्य परिस्थितीचा विचार करून नैसर्गिक आपत्ती मध्ये लागणारी सर्व साधने उपलब्ध असतील याची खात्री करावी. विशेषता अती पावसाने पूर परिस्थिती निर्माण होऊन गावांचा संपर्क तुटणे, आरोग्य यंत्रणांची मदत आदी बाबीकडे विशेष लक्ष पुरविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
विशेषता प्रत्येक गावातील परिस्थिती लक्षात घेऊन त्याठिकाणी आपदा मित्रांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या मार्फत मदत कार्य राबविणे, इतर स्वयंसेवी संस्थांची मदत होईल यादृष्टीने त्यांचा डाटा तयार ठेवणे, आपत्कालीन परिस्थितीत लागणाऱ्या वस्तू, साधने तत्काळ उपलब्ध होतील, याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचनाही डॉ. गेडाम यांनी दिल्या.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी पाचही जिल्ह्यांचा जिल्हाधिकारी यांच्याकडून मान्सूनपूर्व तयारी संदर्भात केलेली कार्यवाही आणि संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठीचे नियोजन जाणून घेतले.
धरणातील पाण्याच्या बॅकवॉटरमुळे निर्माण होणारी परिस्थिती, पूर परिस्थितीमुळे गावांचा संपर्क तुटल्यास तेथे करावयाच्या उपाययोजना आणि द्यावयाच्या सोयीसुविधा, आरोग्य विषयक बाबी, शहरातील नालेसफाई आदी बाबींकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याशिवाय सर्व जिल्ह्यांनी त्यांचे आपत्कालीन कक्ष कार्यान्वित करावे आणि महत्वाची माहिती विभागीय आयुक्तालयास तत्काळ कळविण्याचे निर्देश दिले.
यावेळी महसूल उपायुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.