नंदुरबार l प्रतिनिधी
नातवाच्या लग्नात खास भेट देताना, नंदुरबार जिल्ह्यातील औरंगपुरा (ता. शहादा) येथील भिका लक्ष्मण पाटील यांनी देशसेवेचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या नातवाच्या लग्नातील ग्रहशांती (भाटा) कार्यक्रमाच्या निमित्ताने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस रुपये 31 हजार 111 इतकी रक्कम स्वेच्छेने दिली, असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर डॉ. निलेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
हा विवाह सोहळा 20 मे रोजी औरंगपुरा (ता. शहादा) या त्यांच्या गावी पार पडला. यावेळी माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित हे उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी भेटवस्तूऐवजी थेट सैनिकांसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला. सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या रक्षणासाठी झटत असतात. त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून समाजातील प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यावे, या भावनेतून पाटील कुटुंबाने हा निर्णय घेतला.
या राष्ट्रभक्तीच्या कार्याची दखल घेत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर (डॉ.) नीलेश प्रकाश पाटील यांनी भिका पाटील यांना अधिकृत पावती देत त्यांचा सत्कार केला. त्यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा देताना सांगितले की, “प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस मदत करावी. पाटील कुटुंबाचा हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी असून, देशप्रेमाचा खरा अर्थ कृतीतून दाखवणारा आहे,” असेही डॉ. निलेश पाटील यांनी नमूद केले आहे.