नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर येथील तहसील कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज तालुका लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता. मात्र, या लोकशाही दिनाचा उद्देशच हरवल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तक्रारींचे निवारण करण्याऐवजी अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांची बाजू घेतली जात असल्याचा आरोप तक्रारदार मंगेश येवले यांनी केला आहे.
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी नवापूर तहसील कार्यालयात तालुका लोकशाही दिन आयोजित केला जातो. या दिवशी दाखल झालेल्या तक्रारींवर अध्यक्षांसमोरच तोडगा काढणे अपेक्षित असते. मात्र, कालच्या लोकशाही दिनात तक्रारदारांना वेगळाच अनुभव आला. महिन्याभरापूर्वी दाखल केलेल्या तक्रारींवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर देणे टाळले. या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याऐवजी अध्यक्षांनी तक्रारदारांनाच प्रतिप्रश्न केले आणि पुढील वेळेत उत्तर देण्याचे आश्वासन देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप येवले यांनी केला.
या प्रकारामुळे तक्रारदारालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यासारखे वाटले, असे मंगेश येवले यांनी सांगितले. आजच्या लोकशाही दिनात वैद्यमापन शास्त्र, वजन मापे विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या.
या लोकशाही दिनाला तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील, RFO श्रीमती स्नेहल अवसरमल यांच्यासह विविध विभागांचे कार्यालयीन अधिकारी उपस्थित होते. मात्र, तक्रारदारांना अपेक्षित न्याय मिळाला नसल्याची भावना दिसून आली.
प्रशासनाचा लोकशाही दिन नेमका कोणासाठी आहे, असा प्रश्न आता तक्रारदारांमधून उपस्थित होत आहे.