नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आदिवासी लोककला, लोकपरंपरा व लोक संस्कृतीचे जतन-संवर्धन व्हावे या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोककला ‘रोडाली आदिवासी तमाशा महोत्सवा’चे आयोजन तालुक्यातील जोगणीपाडा येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
आदिवासी लोक गाव दिवाळी, नवगा, होळी, पांढर पुजन, आदिवासी कुलदेवी याहा मोगी चरणी नवस फेडणे, देव पुजा इत्यादी सण-उत्सव साजरा करत असताना रोडली लोककलेच्या सादरीकरणा शिवाय हा उत्सव पूर्ण होत नाही. नंदुरबार जिल्ह्यातील ही अशी एकमेव कला आहे जी राज्यातील इतर कुठल्याही आदिवासी भागात सादर होत नाही. परंतू काळ ओघात लुप्त होत असलेल्या या लोककलेच्या जतन, संवर्धनासाठी व येथील लोककलावंताना शासन सन्मान प्राप्त व्हावा, या उद्देशाने शासनाने प्रथमच या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
या महोत्सवामुळे या लोककलेला नवसंजीवनी प्राप्त होणार आहे. येत्या काळात रोडाली कलेच्या जतन व संवर्धनाच्या विविध प्रक्रियेत या कलेचा समावेश करून येथील लोककलावंतांना लोकाश्रयासोबत राजाश्रयही मिळावा यासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
याप्रसंगी सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी संजय अमृतवार, सचिन पाईकराव, नंदुरबार जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी, पंचायत समीती माजी सभापती अंजानाताई वसावे, धानोरा सरपंच रिनाताई पाडवी, जोगणीपाड्याचे सरपंच नितेश वळवी, आर्डीपाडा सरपंच दिलीप वळवी, केसरपाडा ड्याचे सरपंच अमिताब वसावे, युवा उद्योजक देवेंद्र जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक महोत्सव समन्वयक व खान्देश लोक कलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी तर स्वागत बस्तीराम नाईक यांनी केले. सूत्रसंचालन व आभार महोत्सव सहसमन्वयक नागसेन पेंढारकर यांनी मानले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कृष्णा मोजू रोडाली पार्टी, लोय (ता.नंदुरबार) व सुनील अँड बाबू रोडाली पार्टी, रोझवा (ता.तळोदा) या रोडाली सोंगाड्या पार्टीचे सादरीकरण झाले. यावेळी जिल्ह्यातील विविध रोडाली लोककलावंतांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
या लोककलेला दाद देण्यासाठी धानोरा, जोगणीपाडा येथील ग्रामस्थांसह लोककला रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन महाजन, अमोल ठाकूर, मोहित पाटील, गिरीश वसावे आदींनी परिश्रम घेतले. तीन दिवस चालणारा हा महोत्सव नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जोगणीपाडा येथील सांस्कृतिक सभागृहात संपन्न होत आहे.