नंदुरबार l प्रतिनिधी
धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर बेंगळुरूहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली मधून सोलर प्लेट्स घेऊन जात होते.मात्र सोलर प्लेटच्या खाली 1 क्विंटल अफिम चा चुरा आढळून आला. हा संपूर्ण माल प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आलेला होता.पोलिसांनी 1 क्विंटल अमली पदार्थ जप्त करीत एकाला अटक केली आहे.
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर शिवाराजवळ विसरवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विसरवाडीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महालक्ष्मी हॉटेलसमोर सापळा रचून ( जी.जे.27 टी.डी. 3586) क्रमांकाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला थांबवले. संबंधित ट्रॅक्टर बेंगळुरूहून गुजरातच्या दिशेने सोलर प्लेट्स घेऊन जात असल्याचे दर्शवले जात होते. मात्र तपासणीदरम्यान, सोलर प्लेट्सच्या आड चार मोठ्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये लपवलेला अमली पदार्थ सापडला.
तपासणीसाठी घटनास्थळी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक परीक्षणात चारही पिशव्यांमध्ये एकूण 99 किलो वजनाचा अफिम चा चुरा हा अमली पदार्थ आढळून आला. हा संपूर्ण माल प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आलेला होता, जेणेकरून संशय येऊ नये.
या प्रकरणी ट्रॅक्टरचा चालक रूपचंद प्रजापत (वय अंदाजे ३५, रा. मांगणे की ढाणी, जि. बाडमेर, राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची बाजारभावानुसार किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार सांगितले जात आहे.
ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड आणि लिनेश पाडवी यांच्या पथकाने केली. घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी भेट देऊन पुढील तपासासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून, या कारवाइतून मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीला लगाम बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.