नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्ह्याचा चौफेर विकास व्हावा या उद्देशाने भारतीय जनता पार्टीने गाव वस्ती संपर्क अभियान सुरू केल्या असून त्या अंतर्गत माजी आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे नेते आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शहादा तालुक्यातील हिंगणी गावात भेट देऊन ग्रामस्थांची बैठक घेतली व तेथील विकास कामांमधील अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या.
जागेवरच समस्यांचे निवारण
याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांकडून विविध अडचणी मांडल्या जात असताना डॉक्टर विजयकुमार गावित हे लगेचच संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून व सूचना करून समस्यांचे निवारण करताना दिसले. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत ‘कामे लटकावू नका, ताबडतोब मार्गी लावा’ अशा सूचना याप्रसंगी दिल्या. केळी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याने ते मिळवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
आ. डॉ. गावित यांनी रोहयोचे उपजिल्हाधिका-यांशी लगेचच संपर्क साधत शासनाच्या अनुदानाविषयी माहिती घेतली व या महिन्यात शेतकऱ्यांना केळी पिकासाठी मिळणाऱ्या अनुदान उपलब्ध होईल, असे आश्वासित केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे उपस्थित आदिवासी महिलांनी जीर्ण वीज तारा, विद्युत खांब्यांबाबत आ. डॉ. गावितांसमोर तक्रार केली, त्याची तत्काळ दखल घेत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधला. विजेचे खांब व जीर्ण तारा काढून घेण्याच्या सूचना केल्या. तसेच विद्युत वाहिन्या व खांब आदिवासीच्या वस्तीच्या एका बाजूने बसवाव्यात, अशा सूचना दिल्या. परिणामी उपस्थित ग्रामस्थ समाधान व्यक्त करताना दिसले. अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम लवकरच होणार आहे. त्याआधीच सर्व गाव पाडे मुख्य रस्त्याला जोडल्याने विकासाला चालना मिळणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांमुळे विकासाचा स्तर उंचावणार असल्याचा विश्वास माजी आदिवासी विकास मंत्री आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जि.प.च्या माजी बांधकाम व आरोग्य सभापती हेमलता शितोळे पाटील,
सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, शहादा तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, उद्योजक शशिकांत शितोळे पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, माजी तालुकाध्यक्ष विजय पाटील, अनिल भामरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र रावल, शेखर पाटील, जि.प.चे माजी सदस्य के. डी. नाईक, अनिल भामरे, हिंगणीचे माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, माजी सरपंच सुनील पाटील, दीपक पाटील, बापू मराठे, सामाजिक कार्यकर्ते बाळा पवार, भारत गिरासे, गणेश पाटील आदी उपस्थित होते. गाव वस्ती संपर्क अभियानाचे प्रास्ताविकात माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील यांनी गावाच्या विकास कामासंदर्भात माहिती दिली.