नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवस कृती आराखड्यातील सप्तसुत्री कार्यक्रमांतर्गत सुधारणा कार्यक्रमांच्या अंमलबजावणीस चालना देण्यासाठी “कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा कार्यालयीन वापर” या विषयावर आज जिल्हा नियोजन भवन, नंदुरबार येथे कार्यशाळा घेण्यात आली होती.
या कार्यशाळेस जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) गोविंदा दाणजे, एम.के.सी.एल. चे प्रशिक्षक विनायक कदम, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे आदि यावेळी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) चा वापर शासकीय कार्यालयांमध्ये अनेक प्रकारे उपयुक्त ठरू शकतो जसे की शासकीय दस्तऐवजांचे वर्गीकरण, शोध व विश्लेषण सुलभ करणे, नागरिकांच्या तक्रारी व अभिप्रायांचे विश्लेषण, धोरणनिर्मितीसाठी डेटा विश्लेषणाची मदत, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी AI सहाय्यक प्रणालींचा वापर, आदि कार्यालयीन कामे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या (AI) माध्यमातून करता येतील, असे सांगितले.
या कार्यशाळेस पुणे येथील एम.के.सी.एल. चे प्रशिक्षक विनायक कदम यांनी AI म्हणजे काय, त्याचे प्रकार, तंत्रज्ञानामधील मुख्य संकल्पना, उपयोग, फायदे याबाबत सविस्तर माहिती देवून प्रत्यक्ष वापराबाबत प्रात्यक्षिक दाखवून शासकीय कार्यालयात AI वापराचा फायदे, या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासकीय कामकाज अधिक परिणामकारक, पारदर्शक व लोकाभिमुख कसे होऊ शकते याबाबत वेगवेळी उदाहरणे तसेच एमएस ऑफीस 365 वापराचे फायदे याबाबतची माहिती पीपीटी द्वारे सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना यावेळी त्यांनी दिली.
या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे कार्यालय प्रमुख, अधिकारी कर्मचारी उपिस्थित होते. तसेच तालुकास्तरुन उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय हेही ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे यांनी मानले.