नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील वागदे शिवारात कारवाईसाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर लाकूड तस्करांनी केलेल्या हल्ल्यात वनरक्षक जखमी झाले असून इतर अधिकारी कर्मचारीही जखमी झाले आहेत. याप्रकरणी चार संशयितांना अटक केली आहे. संशयितांकडून साग,खैराच्या अवैध लाकडासह मशिनरी व वाहने असा सुमारे ७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नंदुरबार येथील वन विभागाच्या पथकाला नवापूर तालुक्यातील वागदे गावात एका घरात मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड साठा ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार वन विभागाच्या पथकाने काल मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कारवाईसाठी पोलीस पथकासह पथक रवाना केले.वागदे येथील राजेश प्रभाकर वसावे (वय ४५) याच्या घरात धाड टाकली असता त्या ठिकाणी वन विभागाच्या पथकाला लाखो रुपयांचा अवैध लाकूड साठा, फर्निचर, यंत्रसामग्री (मशिनरी) असा मुद्देमाल मिळून आला. त्याचप्रमाणे, शेतातदेखील धाड टाकली असता मोठी मशिनरी आढळून आली. दरम्यान, कारवाई सुरू असताना वन विभागाच्या पथकावर लाकूड तस्करांनी हल्ला चढवला. त्यामुळे एकच धांदल उडाली. राजेश वसावे याने कुऱ्हाडीने वार केल्याने वनरक्षक दीपक पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी राजेश प्रभाकर वसावे, कैलास प्रताप पाडवी(रा.देवपूरफळी, नटावद), समीर मेहबूब पठाण(वय २६, राख़ांडबारा, ता.नवापूर) व संतोष जत्र्या वळवी( वय ३८, रा.करंजाली, ता.नवापूर) अशा चौघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांचे जादा कुमक मागवण्यात आले. वागदी गावातून शासकीय वाहनातून तसेच ट्रक, ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध लाकूड साठा व यंत्रसामग्री नवापूर येथील वन आगारात आणण्यात आला. रात्री उशिरापर्यंत अवैध लाकूडसाठ्याचा पंचनामा, मोजमापाचे काम सुरु होते. कारवाईसाठी जिल्ह्यातील सर्व वन विभागातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पथकाने सुमारे ५० लाखांचा अवैध लाकूडसाठा व २० लाखांची वाहने असा सुमारे ७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वन विभागाची वर्षभरातील हि सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर कारवाई वनसंरक्षक धुळे प्रादेशिक, पोलीस अधीक्षक नंदुरबार, उपवनसंरक्षक नंदुरबार प्रादेशिक, विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे,
सहायक वनसंरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक, पोलीस अधिकारी, कर्मचारी व इको बटालियनचे अधिकारी व जवान यांच्या मदतीने करण्यात आली आहे.