नंदुरबार l प्रतिनिधी-
प्रयागराज येथून महाकुंभ जलकलशाच्या गंगाजल तीर्थाचे नंदुरबार शहरात प्रभाग निहाय नागरिकांना वाटप करण्यात येत आहे. नंदुरबार येथे माजी आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते नागरिकांना गंगाजल तीर्थाचे वाटप करण्यात आले.
अनुलोममार्फत नंदुरबार शहरात नुकताच प्रयागराज येथून आणलेल्या महाकुंभ जलकलशाचा महाआरती सोहळा माजी मंत्री तथा आ.डॉ. विजयकुमार गावित, माजी आ. शिरीष चौधरी, युवा नेते विक्रांत मोरे यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत नंदनगरीत पार पडला होता.
यावेळी नंदुरबार शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांपर्यंत घरोघरी प्रयागराजच्या महाकुंभ जलकलशाचे गंगाजल तीर्थ वाटप करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार नंदुरबार शहरात घरोघरी नागरिकांना गंगाजल तीर्थ वाटप करण्यात येत आहे. शहरातील साक्री नाका परिसरात असलेल्या वसाहतींमध्ये माजी आ. शिरीष चौधरी व माजी नगरसेवक प्रशांत चौधरी यांच्या हस्ते नागरिकांना प्रयागराच्या महाकुंभ जलकलशच्या गंगाजल तीर्थाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विनोद चौधरी, ओम चौधरी, नानू चौधरी, चेतन साबळे, भोला जगदाळे, सुरेश जोशी, सुनील चौधरी, जगन चौधरी यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.