नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातून मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात अवैध मद्याची तस्करी करण्यात येते. असाच प्रकार सुरू असताना अक्कलकुवा तालुक्यातील काठी शिवारात अवैधरित्या मोज्याची वाहतूक करणारे पिकअप वाहन दुकानाला धडकले त्यामुळे मद्य वाहतुकीच्या प्रयत्न फसला. मात्र अपघातानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यात एका एअर पिस्तूलसह कोयता, तलवार आढळून आली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे. तसेच मद्यसाठ्यासह वाहन असा सुमारे १८ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी चौघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात राज्यात सातपुड्यातील दुर्गम भागातून मोठ्या प्रमाणावर गांजा तसेच अवैध मद्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर करण्यात येते.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातून शहादा, धडगाव, मोलगी, होराफाळी, पिंपळखुटा, होराफळी मार्गे गुजरात राज्यात जाणारा रस्ता असून या रस्त्याने अवैधरित्या मद्याची वाहतूक गुजरात राज्यात केली जाते. दिनांक 29 मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अक्कलकुवा तालुक्यातील अतीदुर्गम भाग असलेल्या काठी शिवारातून अवैधरित्या मद्याची वाहतूक करणारे पिकअप (क्र.एम.एच.२५,इ.१४५४) काठी गावाकडून धडगावकडे भरधाव वेगाने जात होती.त्यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पलटी होत एका दुकानावर धडकल्याने दुकानातील साहित्याचेही नुकसान झाले. अपघात घडताच वाहनातील संशयित पसार झाले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता वाहनात मद्यासह एक कोयता, एक एअर पिस्तूल व एक तलवार आढळून आली.पोलिसांनी एकूण १८ लाख ८५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.मद्य वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे वाहन भटेसिंग रमण्या पावरा याच्या मालकीचे आहे.
वाहन पलटी झाल्यानंतर उमेद गोविंदसिंग पाडवी(रा.काठी पाटपाडा, ता.अक्कलकुवा), नागेश दमण्या वळवी(रा.कात्री, ता.धडगाव), एक अनोळखी या तिघांना पळून गेले असल्याचे प्रत्यक्षदर्शिने सांगितले याप्रकरणी किराणा दुकान चालक बिज्या आरशी वळवी यांच्या फिर्यादीवरुन चौघा संशयितांविरुध्द मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अवैधरित्या मालाची तस्करी करणाऱ्या वाहनात तलवारी व एयर पिस्टल का ठेवण्यात आले होते? याचाही पोलिसांनी कसून तपास करणे गरजेचे आहे.