नंदुरबार l प्रतिनिधी
वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांचे आजोबा महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांच्याविषयी संसदेत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या समाजवादी पार्टीचे खा.रामलाल सुमन यांच्यावर कठोर कारवाई करुन त्यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी नंदुरबार येथील श्री राष्ट्रीय करणी सेना (भारत) यांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत नंदुरबारचे निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे आजोबा महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांच्याबद्दल समाजवादी पार्टीचे राज्यसभा खा.रामलाल सुमन यांनी संसदेत अपशब्द बोलून आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. देशात दिवसेंदिवस महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु शासन व प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. अशा आक्षेपार्ह वक्तव्याच्या कृत्यामुळे शांततेचा भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.
म्हणून संसदेत महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे खा.रामलाल सुमन यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येवून त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी. तसेच खा.रामलाल सुमन यांनी माफी मागावी. तसेच त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा येत्या पंधरा दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,
असा इशारा श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना (भारत) चे राष्ट्रीय युवा महासचिव राणा मुकेशसिंह राजपूत, करणी सेना युवा शक्तीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जितेंद्रसिंग ऊर्फ पिंटू राजपूत, अखिल भारतीय क्षत्रिय महासभाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष मोहितसिंग राजपूत, क्षत्रिय राजपूत समाज समितीचे अध्यक्ष चेतन राजपूत, अजय राजपूत, पंकज राजपूत, पवन राजपूत, धर्मेंद्र राजपूत, गौरव राजपूत, अर्जुन राजपूत, महेश राजपूत, कैलास राजपूत, सोनु वराडे, बुध्या पवार, जय वळवी, बबलु माळी, मोहन माळी, अर्जुन मराठे, धनु मराठे, पप्पु राजपूत, गुलाबसिंग राजपूत आदींनी निवेदनातून दिला आहे.