नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र सरकार राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्या निधीची आणि योजनांची एकत्रित सुनियोजित अमलबजावणी केल्यानंतर किती चांगला गाव विकास करता येतो याचं उत्तम उदाहरण नंदुरबार तालुक्यात उभे राहिले आहे. रस्ते पाणी वीज यासह सर्व सुविधा लाभलेल्या विकसित गावांचे मॉडेल उभे करण्यात आपण यशस्वी झालो. हे सर्व आपल्या सर्वांचे लाडके नेते आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या दूरदृष्टीचे फलित आहे; असे मा. खासदार डॉक्टर हिना गावित म्हणाल्या.
नंदुरबार तालुक्यातील विखरण गावात मुख्य कमान दरवाजाचे लोकार्पण , रस्ता काँक्रिटीकरणाचे उद्घाटन तसेच रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन यांसह विविध विकास कामांचे लोकार्पण उद्घाटन आणि भूमिपूजन मा. आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ विजयकुमार गावित मा. खासदार डॉ हिना गावित मा. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख भाषणात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, माजी तालुकाध्यक्ष दीपक पाटील, गावच्या सरपंच निर्मला राठोड,उपसरपंच सुनीता पवार,ग्रामपंचायत सदस्य सुमन मराठे, भारती पाटील, दिलीप पाटील, ईश्वर मराठे, छाया पाटील, उखडीबाई भिल, धर्मा भिल, ग्रामपंचायत सचिव शरद गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गावकऱ्यांनी मला मताच्या रूपात भरभरून प्रेम दिले. त्याच प्रेमाची परतफेड म्हणून गावातील सर्व समस्यांचे निराकरण करणार असून त्याचबरोबर ज्या सुविधा ग्रामीण भागात हव्या, त्या सर्व या पाच वर्षात उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गाव विकासाला कशी चालना दिली हे सांगतानाच नेते डॉक्टर विजयकुमार गावित व डॉक्टर हिना गावित यांच्या मदतीने केंद्र राज्य व जिल्हा परिषदेच्या योजनांची गाव विकासासाठी कशी एकत्रित अंमलबजावणी केली याची माहिती दिली.