नंदुरबार l प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हंगामी स्वतंत्र खुल्या कांदा मार्केटचे उद्घाटन शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी 300 क्विंटल कांद्यांची आवक झाली असून,1 हजार 825 रुपये पर्यंत भाव मिळाला. यंदाच्या उन्हाळी हंगामात 2 लाख क्विंटल कांद्याची आवक होणार असल्याची शक्यता बाजार समितीकडून व्यक्त करण्यात आली.
शहरातील साक्री नवापूर रस्त्यावरील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समोरील पटांगणात बाजार समितीच्या हंगामी स्वतंत्र खुल्या मार्केटला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. लिलावासाठी शेतकऱ्यांनी रविवारी रात्रीपासूनच वाहनांमधून कांदे आणलेले होते.शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नारळ वाढवून लिलावास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी,सभापती संध्या पाटील यांच्या हस्ते शेतकरी, व्यापाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. प्रसंगी जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील,शेती संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, माजी सभापती विक्रमसिंह वाळवी,माजी जि.प सदस्य देवमन पवार, शेतकी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे, बाजार समिती उपसभापती गोपाल पवार, सचिव योगेश अमृतकर,संचालक किशोर पाटील,सुनील पाटील, ठाणसिंग राजपूत, मधुकर पाटील, लकडू चौरे,विजय पाटील, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.
प्रतवारीनुसार भाव
कांद्याला प्रतवारीनुसार भाव देण्यात येत असतो. पहिल्याच दिवशी सोमवारी 300 क्विंटल कांद्याची आवक झाली. साधारणतः पंधराशे ते अठराशे पंचवीस रुपये पर्यंत प्रतवारीनुसार भाव मिळाला.
गेल्यावर्षी 50 हजार क्विंटल
मागील वर्षी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याची दिसून आले होते.50 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. भाव चांगला मिळाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. नंदुरबार परिसरातील वाघाळे, आष्टा,सोनगिरीपाडा,भिलाईपाडा, ठाणेपाडा त्याचप्रमाणे निजामपूर, छडवेल कोरडे, जैताणे भागातील शेतकऱ्यांनी कांदा मार्केटमध्ये आणला होता.