नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील लिटल विंग्स चिमुकल्यांची संस्कार शाळा आहे. बालवयातच विद्यार्थ्यांच्या कौशल्यांसोबत मूल्यांची जपणूक होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत खेळदेखील आवश्यक असल्याचे प्रतिपादन विद्याभारतीच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षा मुक्ता पटेल यांनी केले.
नंदुरबार येथील लिटल विंग्स या शाळेत आयोजित वार्षिक स्नेहमिलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पालिकेचे प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे यांनी शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.उमाकांत शिदाम यांनी नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याचे कौतुक केले.
समुत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेचे संचालक ललित महाजन यांनी आगामी काळामध्ये अबॅकस, वैदीक मॅथ, शब्दांकन, सायन्स सुपर सॅटर्डे, संस्कृत शिशुवाटिका आदी उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. याप्रसंगी विविध स्पर्धा व उपक्रमात प्राविण्य मिळवणाऱ्या चिमुकल्यांचा मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका अश्विनी पाठक यांनी तर सूत्रसंचालन जयश्री आव्हाड व हेमलाता वसईकर यांनी केले.आभार हेमलता महाजन यांनी मानले. यशस्वीतेसाठी अनिता बडगुजर, सुनिता सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
शिवरायांच्या जीवनपटावरील देखाव्याने वेधले लक्ष
चिमुकल्यांनी दर्जेदार कलाविष्कार सादर केले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर सादर केलेल्या नाटिकेने लक्ष वेधले.विद्यार्थ्यांची संस्कृत श्लोक,हनुमान चालिसा सादर करत उपस्थितांची दाद मिळविली.