नंदुरबार l प्रतिनिधी
माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.विजयकुमार गावित यांनी सुरू केलेल्या शहराच्या प्रत्येक भागात भेट देण्याच्या व जनसंवाद करण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून विजेचा अभाव, पथदिव्यांचा अभाव, रस्त्यांची निकृष्टता, भुयारी गटारीच्या समस्या, दुर्लक्षित राहिलेला ओपन स्पेस विकास याविषयीचे म्हणणे नागरिक मांडू लागले आहेत.
नंदुरबार शहराच्या सर्व भागात भेटी देऊन नागरी समस्या माहीत करून घेत आहे हे सर्व संपल्यानंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन समस्या एकत्रित मांडल्या जातील आणि यंत्रणा कामाला लावून आपल्या सर्व समस्या सोडवले जातील त्याचबरोबर येत्या दोन वर्षात शहराच्या प्रत्येक भागात प्रत्येक परिसरात सुशोभीकरणासह सोयी सुविधा देणारा विकास घडवून दाखवू; असे भरीव आश्वासन महाराष्ट्राचे माझी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी जनसंवाद उपक्रम अंतर्गत दिले.
मागील आठवडाभरात जनसंवाद उपक्रमा अंतर्गत नंदुरबार शहरातील नंदनगरी हाउसिंग सोसायटी, हुडको कॉलनी, म्हाडा कॉलनी, मेघ नगर, नेहरूनगर भागातील नागरिकांशी संवाद साधत राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी त्यांच्या प्रभागातील समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी जितेंद्र रमेश गिरी गोसावी, ॲड.पद्माकर देशपांडे, श्री राळेगावकर, अर्जुन मराठे, प्रमोद गोसावी, नंदकिशोर जयस्वाल, नितीन सोनवणे, प्रदीप कासार, श्याम विसपुते, दत्तू काका शिंपी, हुडको कॉलनीतील श्री चौधरी श्रीगोल्लाहित नरेश शहा अभिमन्यू पाटील माणिक नगर येथील श्री राजपूत श्याम कासार, प्रदीप कासार,श्री कलाल यांच्यासह माणिक नगर मेघ नगर वीर सावरकर नगर येथील नागरिक यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्तपणे म्हणणे मांडले.
त्याचप्रमाणे नंदुरबार शहरातील स्वामी समर्थ नगर येथेही आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी भेट दिली व स्वामी समर्थ नगर भागातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील माजी नगरसेवक प्रवीण गुरव यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. नंतर शहरातील सिंधी कॉलनी परिसरात समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी मोहन खानवाणी कमल ठाकूर सुभाष खानवाणी शंकर तलरेजा यांच्यासह सिंधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, जनसंवाद उपक्रमांतर्गत डॉक्टर विजयकुमार गावित यांनी भेट दिली असता नंदुरबार शहरातील मोहिनीराज परिसरातील नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. ओपन स्पेस सुशोभीकरण करावे, परिसरात विद्युत रोहित्र पुरवठा करण्यात यावा, परिसरातून जाणारा नाला बंदिस्त करावा, तसेच रस्ता दुरुस्ती आवश्यक असल्याचे देखील निदर्शनास आणून दिले.
परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने पुणे येथे शिकत असल्याने नंदुरबार पुणे रेल्वे सुरू करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली. या संपूर्ण मागण्या येत्या दोन वर्षात आराखडा आखून पूर्ण करणार असल्याचे आश्वासन याप्रसंगी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी दिले. भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील माजी नगरसेवक प्रवीण गुरव यांच्यासह या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.